कोरोनात मृत पावलेल्या ३ रुग्णांच्या पार्थिवांवर तब्बल ५ वर्षानंतर अंत्यसंस्कार
रायपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांची आयुष्ये हिरावून घेतली. साथ फैलावण्याचा धोका टाळण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना त्यांचे अंत्यदर्शन मिळणेही दुरापास्त झाले होत. अशात कोरोनाच्या काळात मृत पावलेल्या व्यक्तींची एक गंभीर घटना आता उघडकीस आली आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या ३ रुग्णांच्या पार्थिवांवर तब्बल ५ वर्षानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. ५ वर्षात या तीन मृतदेहाचे रूपांतर सांगाड्यात झाले होते. हे मृतदेह रायपूरच्या मेखरा रुग्णालयात पडून असल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. गौरव सिंह यांच्या सूचनेनुसार या मृतदेहांवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
रायपूरच्या मेखरा हे रुग्णालय राज्यातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयांपैकी एक आहे. येथे दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. अशा स्थितीत त्यांच्या प्रकृतीबाबत निष्काळजीपणा होत असल्याचे उघडकीस आले. अंत्यसंस्काराच्या वेळी या मृतदेहाची स्थिती इतकी भयावह होती की, मृतदेह पुरुषाचा आहे की महिलेचा, हे कळणे कठीण झाले होते.
कोरोना काळात मृत्यू झाल्याने या मृतदेहांचे शवविच्छेदन झाले नव्हते. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची विचारणा केली असता, या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या नव्हत्या असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनंतर कोविड-१९ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून या तीन मृतदेहांवर देवेंद्र नगर मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, मेखरा, पोलीस विभागाचे सदस्य उपस्थित होते.
SL/ML/SL
29 April 2024