केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या हस्ते कुमार केतकरांचा सत्कार

 केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या हस्ते कुमार केतकरांचा सत्कार

मुंबई दि.3(एम एमसी न्यूज नेटवर्क): परळ येथील केईएम रूग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागात अत्यावश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी माजी खासदार डॉ. कुमार केतकर यांनी आपल्या खासदार पदाच्या कारकिर्दित खासदार निधीतून आर्थिक निधी पुरवला होता. डॉ. कुमार केतकर यांनी गरजू रूग्णांसाठी हृदय प्रत्यारोपणाची व्यवस्था उभारण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल आज त्यांचा सत्कार करून रुग्णालय प्रशासनाकडून आभार व्यक्त करण्यात आले. केईएम रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

केईएम रूग्णालयात येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरजू रूग्णांना हृदय प्रत्यारोपण विभागाच्या माध्यमातून माफक दरांमध्ये उपचार उपलब्ध होणार आहेत. या मदतीमुळेच शल्यचिकित्सा विभागात ५६ वर्षानंतर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. या विभागासाठी आवश्यक असणारी कार्डिओग्राफ, नायट्रिक ऑक्साईड आदी उपकरणे ही परदेशातून आयात करण्यात आली. इटली, जर्मनी आदी देशातून आणलेल्या उपकरणांसाठी सुमारे दोन कोटी रूपयांचा निधी हा डॉ. कुमार केतकर यांनी आपल्या खासदार निधीतून पुरवला. तसेच लहान मुलांच्या विभागासाठी थेरोस्कोप खरेदीसाठी आवश्यक ५० लाख रूपयेदेखील याच निधीतून देण्यात आले.

डिसेंबर ते मे या कालावधीत हृदय प्रत्यारोपण विभागाच्या अनुषंगाने तयारीला सुरूवात झाली. दरम्यानच्या कालावधीत केंद्र सरकारच्या संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांच्या चमुच्या नेतृत्वात केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण विभागाच्या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. याठिकाणी आवश्यक उपकरणांच्या पूर्ततेनंतरच विभागामध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी जून २०२४ मध्ये परवानगी देण्यात आली.

SW/ML/SL

3 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *