विदर्भातील मत्सव्यवसाय रोजगाराभिमुख

 विदर्भातील मत्सव्यवसाय रोजगाराभिमुख

नागपूर दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  विदर्भात रोजगार निर्मितीच्या दृष्टीने मत्सव्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘माफसू ‘यांनी त्या पद्धतीने कामाची दिशा ठरवून आराखडे तयार करावेत व मत्सव्यवसायाकडे बघावे ,अशी सूचना राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल केली.

विदर्भातील मत्स्यव्यवसाय विकास आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालन या विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी भंडारा -गोंदीयाचे खासदार सुनील मेंढे,माफसुचे कुलगुरु डॉ.आशिष पातूरकर, पशुसंवर्धन आयुक्त एस.पी. सिंग, मत्स्यव्यवसाय आयुक्त शीतल उगले,यांच्यासह पूर्व विदर्भातील वर्धा वगळता मत्स्य व्यवसायातील संशोधक, तज्ञ व अधिकारी उपस्थित होते.

नागपूर विभागातील नागपूर ,भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या गोड्या पाण्याच्या विपुल जलसाठ्यांमध्ये मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी अधिनियम तयार करणे, केंद्र शासनाच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद – केंद्रीय गोडेपाणी मत्स्यसंवर्धन संस्था(आयसीएआर -सीआयएफए )चे एक प्रादेशिक केंद्र चंद्रपूर येथे स्थापन करणे, विदर्भ मत्स्य विकास आराखडा तयार करणे, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे पशुधन प्रजनन केंद्र विकसित करणे,आदी विषयांसाठी आज महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या सभागृहात वरिष्ठ पातळीवर विचारमंथन झाले.

मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सुधारणा आणि विकासासाठी विदर्भ प्रदेशात मत्स्यबीज उत्पादनासाठी क्लस्टर म्हणून विकसित केला जाऊ शकतो.येथील विपुल जलसंपत्तीमुळे राज्यांमध्ये अंतर्गत मत्स्य व्यवसाय विकसित करण्यास भरपूर वाव असल्याचे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी यावेळी त्यांनी केले. यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद – केंद्रीय गोडेपाणी मत्स्यसंवर्धन संस्था ( आयसीएआर -सीआयएफए )चे एक प्रादेशिक केंद्र चंद्रपूर येथे स्थापन करण्याबाबतची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येत आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्यपालन संशोधन प्रशिक्षण आणि विस्तारासाठी ही एक प्रमुख संस्था आहे. सध्या कौशल्य गंगा (भुवनेश्वर), रहाराह(पश्चिम बंगाल ) आनंद(गुजरात), विजयवाडा (आंध्र प्रदेश ), बंगलोर (कर्नाटक), कल्याणी (पश्चिम बंगाल ) येथे प्रादेशिक केंद्र आहेत. याच प्रमाणे महाराष्ट्रात चंद्रपूर येथे हे केंद्र उभारणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद व केंद्रीय गोडेपाणी,मत्स्यसंवर्धन संस्थेला विनंती करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या केंद्रामुळे राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य पालन वेगाने वाढेल व त्या संदर्भातील प्रशिक्षण व तंत्रज्ञान या भागातील मत्स्यव्यवसायिकांना उपलब्ध होतील,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी विदर्भ मत्स्य विकास आराखडा तयार करण्याबाबतच्या सूचनाही केल्या.

महाराष्ट्र राज्याच्या एकूण भूजलयीय मस्त उत्पादनामध्ये विदर्भाचा वाटा ४६ टक्के आहे. पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात गाव तलाव, मालगुजारी तलाव, तळी, जलाशय, उपलब्ध आहेत. त्यामुळे विदर्भातील मत्स्य विकास आराखडा तयार करणे आवश्यक असून त्यातून हमीयुक्त रोजगार निर्मिती झाली पाहिजे असे, प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

राज्यामध्ये सध्या समुद्रातील मासेमारीशी संबंधित भारतीय मत्स्य पालन अधिनियम 1897 वर आधारित सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 हा कायदा अस्तित्वात आहे. मात्र यामध्ये भूजल मत्स्यव्यवसाय संदर्भात तरतुदी नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 च्या धरतीवर गोड्या पाण्यातील मासेमारी अधिनियम तयार करण्याबाबतच्या सूचना त्यांनी विद्यापीठाला केल्या. या सुधारणांमधून मत्स्य व्यवसायाला व्यावसायिक दर्जा, सुरक्षितता प्राप्त होईल याकडे लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये श्वेतक्रांती आणण्यासाठी वडसा येथील प्रकल्पाचा उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची जुळवणी करणे. मदर डेअरीच्या अधिपत्यात हा जिल्हा आणणे, त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Fisheries in Vidarbha is employment oriented

ML/KA/SL

1 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *