येथे होणार महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा
पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रीडा क्षेत्रात करिअर घडवू इच्छीणाऱ्या देशातील आणि राज्यातील महिलांसाठी सध्या सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहेत. सध्या देशभर पहिल्या महिला IPL स्पर्धेचा जल्लोश सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रात पुरूष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणेच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगली येथे रंगणार आहेत.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आणि पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे उपस्थित होते.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीमधील निर्णयानुसार 23 आणि 24 मार्च रोजी सांगलीत या स्पर्धा पार पडणार आहेत. सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते यांनी दिली आहे.
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. त्यानुसार 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 असे वजनी गट असतील. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील मल्ल खिताबासाठी लढणार आहेत. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे.
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबरोबरच 25 आणि 26 मार्च कोल्हापूर येथे कुमार गटाच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धाही होणार आहेत.
SL/KA/SL
14 March 2023