‘ग्रंथाली’ चळवळीच्या अर्धशतकपूर्ती निमित्त पुण्यात महोत्सवाचे आयोजन

पुणे,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाचनप्रसारामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ग्रंथालीने गेल्या पाच दशकांमध्ये ग्रंथयात्रा, ग्रंथमोहोळ, ग्रंथएल्गार, बहुजन साहित्य यात्रा, विपुल ग्रंथयात्रा, विजय तेंडुलकर संवादयात्रा असे विविध उपक्रम राबविले. या वाटचालीत अनेक जण सहभागी होत गेले. नवविचारांची, नवलेखकांची पुस्तके ग्रंथालीने प्रसिद्ध केली. त्यामध्ये बहुजनांच्या दुःखाचा हुंकार होता. विविध विषय नव्याने पुढे येत होते, नवे लेखक घडत होते. त्याचवेळी ग्रंथाली सामाजिक-सांस्कृतिक भान राखत जगण्याच्या सर्वांगांना भिडणाऱ्या कलांचे व्यासपीठ झाली. अशा ‘ग्रंथाली’ चळवळीच्या अर्धशतक पूर्तीची शुक्रवारपासून (४ एप्रिल) तीन दिवसीय विविध कार्यक्रमांनी सांगता होणार आहे. सांगीतिक मैफल आणि जन्मशताब्दी स्मृतिजागर असे या महोत्सवाचे स्वरूप आहे.
संवाद, पुणे, महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे महापालिकेच्या सहकार्याने ४ एप्रिल रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ गायिका डाॅ. अश्विनी भिडे-देशपांडे आणि पं. कुमार गंधर्व यांचे नातू भुवनेश कोमकली यांच्या गायनाने सांगता समारंभाची नांदी होणार आहे. या मैफलीमध्ये विजयराज बोधनकर व्यक्तिचित्र रेखाटन करणार आहेत.
जयवंत दळवी आणि गंगाधर गाडगीळ यांचे साहित्य आणि व्यक्तित्त्व उलगडणारा कार्यक्रम शनिवारी (५ एप्रिल) ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे दुपारी तीन वाजता, तर, विद्याधर पुंडलिक यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम रविवारी (६ एप्रिल) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. रामदास भटकळ, कुमार केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेल्या या कार्यक्रमाच्या संहिता राजीव नाईक आणि मोनिका गजेंद्रगडकर यांनी लिहिल्या आहेत. यानिमित्ताने ग्रंथप्रदर्शन आणि सवलतीत विक्री होणार आहे.