‘क्रीडा पानाचे जनक’ वि. वि. करमरकर यांचे निधन

 ‘क्रीडा पानाचे जनक’  वि. वि. करमरकर यांचे निधन

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच”क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अंधेरी येथे पारशीवाडा स्मशानभूमी, अंधेरी पूर्व येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

१९६० च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले. यासाठी एक पूर्ण पान तयार करून खेळांची आवड असणाऱ्या वाचकांची भूक त्यामधून त्यांनी पूर्ण केली. १९६२ मध्ये महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या टीममध्ये करमरकर यांचा सहभाग होता.

क्रीडा पानाचा प्रयोग यशस्वी

द्वा.भ.कर्णिक संपादक असलेल्या या दैनिकात सुरुवातीला आधी दोन कॉलममध्ये क्रीडा जगताच्या बातम्या येत असत. करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले. संपूर्ण मराठी दैनिकांच्या जगतात हा प्रयोग पहिल्यांदा झाला आणि वाचकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यामुळे नंतर राज्यात इतर दैनिकांनी सुद्धा एक पूर्ण पान खेळांच्या बातम्यांना देण्याचा निर्णय घेतला.

यामुळे खेळांची आवड असणाऱ्या पत्रकारांना यामुळे पूर्ण वेळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या. परिणामी खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक आणि कार्यकर्ते यांच्या सततच्या प्रयत्नांची धडपड ठळकपणे लोकांसमोर आली. या सर्वांचे निर्माते करमरकर असल्याने ते क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले गेले. विशेष म्हणजे मटाचे क्रीडा पान त्यांनी इतके लोकप्रिय केले की पहिल्या पानावर एक नजर टाकली की वाचक थेट मागच्या खेळांच्या पानावर जात.

समालोचन ही केले

आकाशवाणी आणि दूरदर्शन यावर त्यानी अनेक विविध खेळाचं धावते समालोचन केले आशियाई आणि ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेदरम्यान दोन/तीन आठवडे त्यांचा कॉलम “ना खंत ना खेद” यात अत्यन्त अभ्यासपूर्ण वेगळी मौलिक माहिती वि.वि.क.आपल्या तजेलदार शैलीत मांडत असत. अत्यंत वाचनीय असं लिखाण मराठी क्रीडाक्षेत्रात अभूतपूर्व असेच होते.

चौकार,षटकार, धावफलक, झटपट क्रिकेट, चौफेर फटकेबाजी, टे टे दापाझो, राकेफ असे अनेक सोपे सुटसुटीत शब्द याची निर्मिती त्यांनी केली. मराठी भाषा ओघवती आणि प्रभावी करायची असेल तर ती आधी सोपी असली पाहिजे, याचा त्यांनी कायम अट्टाहास धरला. परिणामी त्यांच्या बातम्या आणि लेख माहितीसह खूप परिणामकारक ठरले.

आपल्या धावत्या समालोचनात सोप्या आणि आपण निर्मित केलेल्या शब्दांची पेरणी ते अचूक करीत असत. यामुळे श्रोत्यांना अधिक तपशीलपूर्ण माहिती मिळत असे.

ML/KA/SL

6 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *