देशात प्रथमच बांबू क्रॅश बॅरियरची केली गेली उभारणी

चंद्रपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज बांबू क्रॅश बॅरियर बाबत ट्विट करत माहिती दिली. देशात प्रथमच रस्ते उभारणी कामात बांबू क्रॅश बॅरियर चा वापर करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा ते वणी या मार्गाचे नव्याने बांधकाम केले जात आहे. यादरम्यान चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीवर मोठा पूल बांधला जात आहे. या पुलाच्या परिसरात या बांबू क्रॅश बॅरियर ची उभारणी करण्यात आली आहे.एरवी देशभर महामार्गाच्या बाजूला स्टील मिश्रित क्रॅश बॅरियरची उभारणी केली जाते मात्र बांबूचा वापर करून क्रॅश बॅरियर ची उभारणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अशी आहे प्रक्रिया

बालकोआ प्रकारातील हा बांबू विशिष्ट प्रक्रिया करून अधिक मजबूत व बारमाही वातावरणासाठी टिकाऊ बनविण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबूची उपलब्धता आहे. अशा स्थितीत पर्यावरण अनुकूल असलेला बांबू रस्ते निर्मितीच्या कामात क्रॅश बॅरियर च्या रूपात वापरला गेल्यास बांबू व्यवसायाला चालना मिळणार आहे.

बांबू क्रॅश बॅरियर चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बॅरियरचा 50 ते 60 टक्के फेरवापर करता येणार आहे. दळणवळण मंत्रालयाच्या देशातील विविध प्रयोगशाळांमध्ये या बांबू क्रॅश बॅरियरची अग्नीरोधक व क्षमता विषयक तपासण्या केल्यानंतर याची उभारणी करण्यात आली.

सध्या 200 मीटर बांबू क्रॅश बॅरियर उभारण्यात आला असून या प्रयोगाचे परिणाम पाहून देशात इतरत्र असा प्रयोग राबविला जाणार आहे. बांबू क्रश बॅरियरच्या उभारणीमुळे देशात रस्ते निर्मितीच्या बाबतीत मेक इन इंडियाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

ML/KA/SL

6 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *