टॅरो रीडिंग: गूढ पत्त्यांमागील भविष्यकथनाचा रहस्यभेद

 टॅरो रीडिंग: गूढ पत्त्यांमागील भविष्यकथनाचा रहस्यभेद

मुंबई, दि. 4 (सुचिता सावंत) : भविष्य जाणून घेण्याची जिज्ञासा आपल्यापैकी सगळ्यांनाच असते. काहीजण ज्योतिष्याकडे जाऊन आपली जन्मकुंडली दाखवतात, तर काही हस्तरेखांवरून आपले भविष्य जाणून घेतात. प्राचीन काळापासून चालत आलेल्या अशा भविष्य कथनाच्या पद्धती काळानुरूप बदलत गेल्या, किंवा त्यांच्या प्राचीन पद्धतींमध्ये काही सुधारणा होत गेल्या. अशाच भविष्य कथनाच्या प्रचलित होत चाललेल्या पद्धतींपैकी एक म्हणजे ‘टॅरो रीडिंग’. ७८ पत्त्यांतून आपले भविष्य जाणून घेण्याचा हा एक अनोखा प्रकार आहे.

पहिल्यांदा आपण या टॅरो रीडिंगचा इतिहास जाणून घेऊयात. १५०० शतकात टॅरो हे इटलीमध्ये प्रचलित होते, पण तिथे या पत्त्यांचा उपयोग फक्त मनोरंजनासाठी किंवा खेळण्यासाठी केला जात असे. त्यानंतर काही काळाने रोममध्ये जिप्सी जमातींनी याचा उपयोग भविष्य कथनासाठी सुरू केला. तरीही, त्यावेळी हा प्रकार फारसा लोकप्रिय नव्हता. पण १८८६ ते १८९० च्या काळात गोल्डन डॉन सोसायटीत, जिथे ज्योतिष विषयावर संशोधन होत असे, तिथे लेखक एडवर्ड वेट यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी याबाबत सखोल अभ्यास करून टॅरो डेकचा प्रसार केला. त्यांनी तयार केलेला ‘टॅरो एडवर्ड डेक’ नंतर रायडर डेक म्हणून प्रचलित झाला.

आता आपण टॅरो कार्ड्सची ७८ पत्त्यांची विभागणी पाहूयात. २२ पत्त्यांना ‘मेजर अर्काना’ आणि उर्वरित ५६ पत्त्यांना ‘मायनर अर्काना’ असे म्हटले जाते. ‘अर्काना’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘गूढ’ असा आहे. ह्या कार्डांवरील चित्रांतून जे रहस्यमयी संकेत मिळतात, त्यातून रीडर भविष्य कथन करतो.

पण हे भविष्य कथन नेमके कोणत्या सूत्रांवर आधारित असते, हे जाणून घेणे गरजेचे आहे. पत्त्यांवरील चित्रांवरून भविष्य कथन करणे म्हणजे एखाद्या चित्र प्रदर्शनाला जाऊन चित्रे पाहून त्यांचा अर्थ लावण्याइतके सोपे शास्त्र नक्कीच नाही. कारण पत्त्यांवरील चित्रांचे, अंकांचे आणि रंगांचे सखोल निरीक्षण करून भविष्य कथन करण्यासाठी जी सूत्रे महत्त्वाची आहेत, ती म्हणजे शकून शास्त्र – ब्रह्मांडाकडून मिळणारे दैवी संदेश, अंकशास्त्र, रंग, चित्र निरीक्षण आणि अंतर्ज्ञान.या सूत्रांचा उपयोग रीडरने कसा करावा, ह्याचा विचार करूयात. या रहस्यमय प्रवासाला पुढे चालू ठेवूयात, जिथे आपण आणखी गूढता उलगडू.

(लेखिका या शास्त्राच्या अभ्यासक तसेच चित्रपट आणि मालिका लेखिका देखील आहेत)

ML/ML/PGB
4 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *