भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती

मुंबई, दि. 14 (जाई वैशंपायन) :आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या ज्या पैलूंवर काहीसे कमी लेखन-
वाचन-चर्चा होते, त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
न्यायवेत्ते, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, राजकीय नेते आणि असे कित्येक पैलू या महामानवाच्या अंगी एकवटलेले होते. अत्यंत व्यासंगी, वाचनप्रिय आणि अभ्यासू अशा बाबासाहेबांनी समाजात जगताना कोवळ्या वयात जातीभेदाची झळ सोसली. तथापि, ‘त्या हालअपेष्टांचा, अपमानाचा प्रतिकूल परिणाम स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर करून घेऊ नये’, इतके समजणारे विचारी मन बालवयातही त्यांच्याकडे होते. या पिचलेल्या अवस्थेतून बाहेर येण्याचा एकमेव राजमार्ग या अर्थाने शिक्षणाचे महत्त्व समजून घेऊन त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला.

बडोद्याच्या महाराजांच्या शिष्यवृत्तीच्या आधारे एलफिन्स्टन महाविद्यालयातून पदवीधर झाल्यानंतर करारानुसार ते बडोद्याला गेले. परंतु त्याने शिक्षणाचा प्रवास थांबला नाही. काही काळातच त्यांची निवड अमेरिकेतील उच्चशिक्षणासाठी झाली. कोलंबिया विद्यापीठातून 1915 आणि 1916 मध्ये अनुक्रमे एमए आणि पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते लंडनला रवाना झाले. तेथे कायद्याच्या शिक्षणाबरोबरच त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये डी.एससीची तयारी करण्यासही परवानगी देण्यात आली. कालान्तराने त्यांनी बार-ऍट-लॉ आणि डी.एस्सी. पदवीदेखील मिळवली. 1916 मध्ये त्यांनी ‘National dividend for India — A Historic and Analytical Study’ हा शोधनिबंध लिहिला आणि त्यांना पीएचडी मिळाली.

त्यांनी लंडन विद्यापीठातून एम.एससी.ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात काही काळ घालवला. 1923 मध्ये, त्यांनी डी.एससी. ही पदवी घेण्‍यासाठी “Problem of rupee – its origin and solution” हा प्रबंध सादर केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले ! आणि त्याचवर्षी म्हणजे 1923 मध्ये त्यांना वकीलांच्या बारमध्ये बोलावण्यात आले.

शिक्षणाची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नसे. मुंबईत सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापकी करत असताना, लंडनमध्ये कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण पुन्हा सुरु करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. ‘एकदा शिकवताना माणूस दोनदा शिकतो’ असे म्हणतात. डॉ.आंबेडकर हे तर अनेक विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय प्राध्यापक होते. म्हणजे या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने किती खोलात शिरून अनेक विषयांचा गाढा अभ्यास केला असेल ! अर्थशास्त्र, राजकारण, कायदा, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान संपादन केले. त्यांचे वाचन चांगले असल्याने ते विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. राजकीय अर्थशास्त्र, कायदा अशा विभिन्न प्रकृतीच्या विषयांचे अध्यापन त्यांनी केले.
आजच्या मुंबईतील आजच्या शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरादेखील त्यांनी सांभाळली होती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर शिक्षणाची आस आणि कास सोडली नाही. राजकीय उन्नती साधून घेतानाही आणि पददलितांच्या तसेच शोषितांच्या उद्धाराचे कार्य करतानाही त्यांनी शिक्षणालाच सर्वोच्च प्राधान्य दिले. ‘शिका-संघटित व्हा-संघर्ष करा’ हा त्यांचा संदेशच पुरेसा बोलका आहे. दुर्दैवाने अनेक संधीसाधू लोकांनी त्यातील पहिल्या मुद्द्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले त्यामुळे आपल्या देशातील पुढच्या पिढ्या म्हणाव्या तितक्या तेजस्वी आणि स्वावलंबी झाल्या नाहीत.

डॉ.आंबेडकर यांच्या आर्थिक अभ्यासाचा पैलू तितकासा प्रकाशात आलेला दिसत नाही. वास्तविक पाहता, देशाची मध्यवर्ती बँक- म्हणजेच रिजर्व बँक- जिची सध्या नव्वदी साजरी करण्याकडे वाटचाल सुरु आहे- तिच्या स्थापनेत बाबासाहेबांमधील अर्थतज्ज्ञाचे योगदान मोठे होते. वर उल्लेख केलेला रुपयाबद्दलचा प्रबंध/ त्यांचे ते पुस्तक १९२६ मध्ये हिल्टन यंग आयोगासमोर चर्चिले गेले. ब्रिटिश सरकारच्या धोरणांमुळे भारतीय लोक कसे गरीब होत चालले आहेत, यावर त्या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. आयोगासमोर झालेल्या चर्चेत डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी शिफारस केल्यावरून आरबीआयच्या संकल्पनेचा पाया घातला गेला, तिचे स्वरूप आणि तिची कार्यशैली ठरली. आजपर्यंत चलनवाढ नियंत्रण, बँकांचे सक्षमीकरण, अर्थव्यवस्थेला बळकटी अशा अनेक पैलूंवर काम करत आरबीआय खंबीरपणे उभी आहे, कोविडसारख्या आह्वानात संकटातून संधी शोधत तिने देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरले आहे- या सगळ्याच्या मुळाशी आरबीआयच्या समर्थ बांधणीच्या रूपाने बाबासाहेबांचा अनुभव आणि दूरदृष्टी कार्यरत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘कोणत्याही देशाला काळा पैसा आणि बनावट चलन या धोक्यांपासून वाचण्यासाठी, दर १० वर्षांनी विमुद्रीकरण केले पाहिजे’ अशा शब्दांत बाबासाहेबांनी विमुद्रीकरणाचा पुरस्कार केला आहे. जमिनीचा सारा भरण्याच्या अन्यायकारक अशा खोती पद्धतीचे निर्मूलन करण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बाबासाहेबांच्या कार्याचा आणखी एक दुर्लक्षित पैलू म्हणजे, अर्थव्यवस्थेतील ‘कामगार’ या महत्त्वाच्या वर्गाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेले कार्य. महागाई भत्ता, कर्मचारी विमा, वैद्यकीय कारणाने सुट्टी, किमान वेतन, समान कामासाठी समान वेतन अशा अनेक कामगारहिताच्या संकल्पना मांडण्याचे श्रेय बाबासाहेबांचे आहे. भारतभरात एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस ची स्थापना करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांची भारतीयत्वाची भावना. त्यांनी पददलित, शोषित, पीडित वर्गाच्या उद्धारासाठी, समाजसुधारणेसाठी प्रचंड कार्य केले हे आपण जाणतोच. परंतु, असे काम करताना, समाजात द्वेषाच्या आणि भेदाच्या नव्या भिंती उभारल्या जाऊ नयेत, असे त्यांचे मत होते. ‘सर्वांनी प्रथम भारतीय असावे, शेवटी भारतीय असावे आणि भारतीयत्व सोडून दुसरे काहीच नसावे’ असे ते म्हणत ! यावरून त्यांची भारतीयतेवरील गाढ निष्ठा दिसून येते. या निष्ठेपोटीच त्यांनी देशाच्या संविधानाच्या रचनेत डोळसपणे मोलाचे योगदान दिले. भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यामधील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून, 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने, त्यांना LL.D ची पदवी बहाल केली. आजही संविधानात्मक व्यवस्थेवरील त्यांचा भक्कम विश्वास हाच आपल्या लोकशाहीचा आणि सुशासनाचा पाया आहे.

JW/ML/PGB 14 APR 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *