दिव्यांग आणि निराधार मुलांच्या कलागुणांना मुंबईत व्यासपीठ; ‘लाकूडकला आजपासून प्रदर्शन
मुंबई, दि १४:
दिव्यांग, मूकबधिर आणि निराधार मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत उभारण्याच्या उद्देशाने मुंबईत विशेष ‘लाकूडकला प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि स्व. अंबादापत वैद्य मतीमंद, मुकबधिर व लावारिस बालगृह यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत समाजसेवक व संयोजक डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी प्रदर्शनाची गुरूवारी माहिती दिली. मानवता आणि करुणेच्या भावनेतून प्रेरित होऊन आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात गोपाल एज्युकेशनल सोसायटीद्वारे संचालित स्व. अंबादापत वैद्य मानसिकदृष्ट्या विकलांग, कर्णबधिर आणि अपंग बालगृहातील मुलांनी तयार केलेल्या आकर्षक लाकडी कलाकृती मांडण्यात येणार आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या मुलांनी आपल्या मेहनत, सर्जनशीलता आणि जिद्दीच्या बळावर विविध काष्टशिल्प आणि कलात्मक वस्तू तयार केल्या आहेत. प्रदर्शनातील सर्व कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध असणार असून, त्यातून मिळणारा संपूर्ण निधी मुलांच्या निवास, अन्न, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी बोलताना डॉ. शंकरबाबा पापळकर म्हणाले, “समाजातील प्रत्येकाने या सेवाभावी उपक्रमाला सहकार्य करून दिव्यांग आणि निराधार मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करावा. आपल्या उपस्थितीमुळे आणि पाठिंब्यामुळे या मुलांना आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल.”
तसेच, बेवारस दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी सरकारने आयुष्यभर संरक्षण देणारा विशेष कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सौरभ कटियार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.KK/ML/MS