पोंभुर्ले येथे होणार 31 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिला जाणारा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा 31 वा दर्पण पुरस्कार जाहीर झाला असून 6 जानेवारी पत्रकार दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभेकरांच्या मूळ गावी म्हणजे पोम्बुर्ले येथे हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. Distribution of 31st state level ‘Darpan’ awards to be held at Pombhurle
‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 31 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात 6 जानेवारी रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी आयोजित केला आहे. या कार्यक्रमास कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांची उपस्थिती, मराठवाडा विभाग साहित्य परिषद, नांदेडचे अध्यक्ष डॉ.जगदीश कदम, रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना विजय मांडके यांनी सांगितले की, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पोंभुर्ले – जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ आणि जांभेकर कुटूंबिय यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी संस्थेच्या पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन तसेच राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण केले जाते. यंदा या पुरस्कारांचे 31 वे वर्ष असून या समारंभात सन 2023 च्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कारां’चे वितरण होणार आहे. यामध्ये ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार माधव कदम (सिंधुदुर्ग), राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार प्रशांत कदम (नवी दिल्ली), सागर देशपांडे (पुणे), कैलास म्हापदी (ठाणे), श्रीकांत कात्रे (सातारा), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार – सौ.कृतिका पालव (मुंबई), साहित्यिक गौरव पुरस्कार – डॉ.भगवान अंजनीकर (नांदेड), विशेष ‘दर्पण’ पुरस्कार – शशिकांत सोनवलकर (दुधेबावी, ता.फलटण), विक्रम चोरमले (फलटण) यांचा समावेश आहे.
‘दर्पण’कारांच्या जन्मभूमीत ‘दर्पण’ स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमास ‘दर्पण’कारांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, माध्यमप्रेमी नागरिक आणि पोंभुर्ले पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव , कृष्णा शेवडीकर, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ.प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर यांनी केले आहे.
ML/KA/PGB
2 Jan 2024