वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने फळबाग, पिकांचे नुकसान.
छत्रपती संभाजी नगर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात परवा झालेल्या विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हाताशी आलेले गहू, मका पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडण्या अगोदरच भुईसपाट झाले असून केवळ निराशा पदरी पडल्याने
पिकांच्या झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नाचनवेलसह परिसरात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली व पावसाचा जोर अधिक वाढत गेला.त्यात परिसरात मका,कांदा,गहु,मिरची पिकांसह आंबा ,चिकू,
फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा चीकू च्या फळझाडाखाली लहान मोठ्या फळांचा सडा पडलेला आहे एकानंतर एक तिहेरी संकट शेतकऱ्यावर ओढून आल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
या अगोदर महीनाभरापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.त्यात गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले होते.त्यात उशीरा लागवड केलेले गहू पीक काही प्रमाणात वाचली असतांनाच पुन्हा जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गव्हाच्या पिकांबरोबरच मका ,कांदा, मिरची पिकांसह फळबागाचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक पदरी न पडता अवकाळी पावसाने हिरावले आहे.त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील पिकांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही तर पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हाताशी आलेली पिक आडवी झाली.
शेतकऱ्याच्या पाठीशी एकापाठोपाठ संकटाची मालिका सुरुच असल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.
शासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.