डिजिटल अटक: सायबर घोटाळ्यांचा नवीन प्रकार आणि नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा
जितेश सावंत
सध्याच्या काळात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून, घोटाळेबाज नवनवीन फसवणूक तंत्रांचा वापर करत आहेत. यातीलच एक धोकादायक प्रकार म्हणजे ‘डिजिटल अटक’. हा एक प्रकारचा ऑनलाइन फसवणूक प्रकार आहे ज्यामध्ये पीडितांना फोन, ईमेल, किंवा मेसेजद्वारे संपर्क साधला जातो. त्यामध्ये त्यांना ओळख चोरी किंवा मनी लॉन्डरिंगसारख्या अवैध कामात गुंतल्याचा आरोप करून गोंधळात टाकले जाते.
काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सी, CERT-In ने ‘डिजिटल अटक’ या नव्या सायबर घोटाळ्याविरुद्ध नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या फसवणुकीत, घोटाळेबाज पीडितांना अटक किंवा कायदेशीर परिणाम भोगण्याची धमकी देतात आणि त्यांना तातडीने कारवाई करण्यास भाग पाडतात
या घोटाळ्यात पीडितांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडले जाते. घोटाळेबाजांचा उद्देश घाई आणि भीतीचा फायदा घेत लोकांना फसवण्याचा असतो. त्यामुळे, कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सवर संवेदनशील वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती देण्याचे टाळावे. जर कोणी फोनद्वारे किंवा ऑनलाइन पद्धतीने पैसे मागत असेल, तर तो घोटाळाच असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आपली गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये
नागरिकांनी जागरूक आणि सतर्क राहणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून ते स्वत:ला या नव्या प्रकारच्या सायबर धोके आणि फसवणुकीपासून सुरक्षित ठेवू शकतील. अशा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना पुढीलप्रमाणे आहेत:
- अधिकृतता तपासा: कोणत्याही अनोळखी कॉल, ईमेल, किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा, सरकारी एजन्सी कधीही फोनवर धमकी देत नाहीत किंवा पैशांची मागणी करत नाहीत.
- सतर्क आणि सावध रहा: जर कोणी आपल्याला पैसे देण्यास सांगत असेल, तर त्यावर संशय घ्या. CERT-In ने स्पष्ट केले आहे की अधिकृत संवादासाठी सरकारी संस्था WhatsApp किंवा Skype सारख्या सोशल मीडियाचा वापर करत नाहीत.
- संवेदनशील माहितीचे संरक्षण करा: कोणत्याही अनोळखी संपर्कावर वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती देऊ नका. फसवणूक करणारे OTP, बँक खाते तपशील किंवा क्रेडिट कार्ड माहिती मागू शकतात
4.अधिकृत प्लॅटफॉर्म्सचा वापर करा: सरकारी एजन्सी त्यांच्या सुरक्षितता संबंधित सूचना अधिकृत वेबसाइट्स किंवा ईमेलद्वारेच देतात. म्हणून, अनधिकृत वेबसाइट्स किंवा प्लॅटफॉर्म्सवर वैयक्तिक माहिती देण्याचे टाळावे.
याशिवाय अजूनही अनेक प्रकारचे घोटाळे आहेत, ज्यात:
फिशिंग: बनावट ईमेल्स किंवा मेसेजेसद्वारे वैयक्तिक माहिती चोरणे.
लॉटरी आणि बक्षीस घोटाळे: मोठी रक्कम जिंकल्याचे खोटे आश्वासन देऊन प्रक्रिया शुल्क मागणे.
टेक सपोर्ट घोटाळे: तांत्रिक मदतीच्या नावाखाली संगणकात अनधिकृत प्रवेश मिळवणे.
गुंतवणूक घोटाळे: त्वरित नफा देण्याचे खोटे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना फसवणे.
चुकून पैसे ट्रान्सफर घोटाळे: चुकीने पैसे पाठवल्याचे सांगून ते परत मागणे.
फोन घोटाळे: या प्रकारात पीडितांना टेलिकॉम नियामक संस्थेच्या नावाने कॉल किंवा मेसेज येतो, ज्यात त्यांच्या सेवेत समस्या असल्याचे सांगितले जाते आणि तातडीने वन-टाईम पासवर्ड (OTP) किंवा बँक माहिती देण्याची मागणी केली जाते.
पार्सल घोटाळे: हे ‘डिजिटल अटक’ प्रकारासारखेच असतात. घोटाळेबाज पीडितांना फोन किंवा मेसेजद्वारे कळवतात की त्यांचे ड्रग्सचे पार्सल जप्त झाले आहे आणि दंड न भरल्यास अटक किंवा अन्य कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देतात.
नागरिकांनी हे लक्षात ठेवावे की अशा प्रकारच्या फोनवर घाबरू नका. कोणतीही तपास संस्था फोनवरून अशी माहिती विचारत नाही. घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी, थांबा, विचार करा, आणि मग कृती करा.
हेही लक्षात ठेवा की कोणतीही तपास संस्था फोनवर किंवा व्हिडिओ कॉलद्वारे अशा प्रकारची चौकशी करत नाही. डिजिटल सुरक्षेसाठी तीन महत्त्वाचे टप्पे आहेत: थांबा, विचार करा, आणि मग कृती करा. शक्य असल्यास, कॉलचा स्क्रीनशॉट घ्या किंवा कॉल रेकॉर्ड करा. कोणतीही सरकारी संस्था फोनवरून धमकी देत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही.
संबंधित सायबर गुन्हेगारीच्या घटनांबाबत तातडीने कारवाई करण्यासाठी, भारतात सायबर गुन्ह्यांसाठी हेल्पलाइन नंबर 1930 आहे. नागरिकांना सायबर गुन्हा ऑनलाइन रिपोर्ट करण्यासाठी भारत सरकारच्या पोर्टलवरही सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हा रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) हे एक वेबसाइट आहे जिथे आपण सायबर गुन्हे रिपोर्ट करू शकता: वेबसाइट: cybercrime.gov.in
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant
(लेखक शेअरबाजार आणि सायबर कायदा यातील तज्ञ आहेत )