जागतिक सर्जनशीलता दिवस

 जागतिक सर्जनशीलता दिवस

मुंबई, दि. 21 (जाई वैशंपायन) : पूर्वीच्या काळातील एक कथा सांगितली जाते. एका राजाला शेजारच्या राज्यातून एक आह्वान देण्यात आले- “येत्या सहा महिन्यांत मडकेभर अक्कल पाठवून द्या. अन्यथा तुमच्या राज्यात अक्कल नाही असे मान्य करा.” झाले! राजसभेतील अमात्य, प्रधान, सेनापती, राजगुरू, राजवैद्य, बुद्धिवंत सल्लागार.. कोणाकोणालाच मुळी अर्थच कळेना, त्यामुळे उपाय सापडेना. राजा चिंतेत पडला‌. नाचक्कीची वेळ. शेवटी दवंडी पिटून राज्यातील सामान्य प्रजेपुढे प्रश्न मांडण्यात आला. एका चतुर शेतकऱ्याने पुढे येऊन आत्मविश्वासाने दायित्व घेतले नि राजाला आश्वस्त केले. त्याने सांगितल्याप्रमाणे बरोबर चार महिन्यांनी राजा त्याच्या शेतावर गेला. मडके तयार होते. पाहतो तर काय, मडक्याच्या आतमध्ये एक पूर्ण वाढलेला गरगरीत भोपळा! शेतकरी राजाला म्हणाला, “महाराज, आता हे मडकं त्या राजाला पाठवा, नि सांगा- मडकंभर अक्कल पाठवली आहे, ती अक्कल काढून घ्या नि मडकं तेवढं पाठवून द्या… नाहीतर, ‘तुमच्या राज्यात अक्कल नाही’ असं मान्य करा.” चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच, पण उलगडा करणे आवश्यक आहे म्हणून सांगते – चतुर शेतकऱ्याने आह्वान स्वीकारल्यावर भोपळ्याची बी पेरली, भोपळा उगवू लागल्याचे दिसताच वेलीचा तो भाग अलगद मडक्याच्या तोंडातून आत सोडला. आतमध्ये भोपळा पूर्ण वाढला, गरगरीत झाला आणि मग शेतकऱ्याने तो वेलीपासून वेगळा केला! स्वतःचे उत्तर देतानाच शेजारच्या राजासाठी आह्वानही तयार करून ठेवले! आहे की नाही मडकेभरून अक्कल?

आज ही गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे, आज जागतिक सर्जनशीलता आणि अभिनवता दिवस पाळला जात आहे. असे विचार जीवनात सर्वच क्षेत्रांत आवश्यक ठरतात. रोजच्या जीवनात आपण किंवा भोवतालचे कोणीतरी सर्जनशील राहून अभिनव संकल्पना मांडत असते, राबवत असते. कधी समजून -उमजून तर कधी नकळतच – अंतःप्रेरणेने असे विचार मनःपटलावर उमटतात. कलात्मक अभिव्यक्ती असो की समस्यांची उकल काढण्याचा मार्ग – सर्वत्र सर्जनशीलता आणि अभिनव विचार आवश्यक ठरतात.

असे विचार सामान्यतः आखीव रेखीव चौकटीच्या बाहेरचे विचार असतात. त्यासाठी वेगळे चातुर्य लागते. अशा चातुर्याचा उचित सन्मान करण्यासाठी, तसेच जीवनातील विविध अंगांमध्ये सृजनात्मकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २१ एप्रिल हा दिवस World creativity and innovation day म्हणून निश्चित केला आहे.

हा जरी जागतिक दिवस असला तरी, सर्जनशीलता किंवा सृजनात्मकता म्हणजे काय, याची एकच जागतिक सार्वत्रिक व्याख्या करता येणार नाही. विभिन्न दृष्टिकोनांतून सर्जनशीलतेचे विभिन्न अर्थ लावले जाऊ शकतात. सर्जनशील उपाय करण्यासाठी पुस्तकी ज्ञान पुरेसे नसते तर त्या माहितीच्या पलिकडे जाऊन त्यातून वेगळाच मार्ग सुचावा लागतो. त्यासाठी थोडा धोका पत्करण्याची तयारी असावी लागते, कारण मुळात अभिनवतेतून आलेले उत्तर सरधोपट चाकोरीच्या बाहेरचेच असते आणि ते सुचणारी सृजनशील व्यक्ती थोडीशी बेधडक वृत्तीची असते. अकबर-बिरबलाच्या एका गोष्टीचा संदर्भ देऊन पुढे जाऊ- जावई त्रासदायक वागतात, त्यामुळे सर्व जावयांना सुळावर चढवण्याचे अकबराचे फर्मान आणि त्यावर मात करण्यासाठी बिरबलाने केलेली योजना. चांदीचा सूळ स्वतः साठी नि सोन्याचा सूळ अकबरासाठी- कारण तेही कोणाचे तरी जावई होतेच – असे शब्द ऐकून अकबराला आपल्या आज्ञेतील मूर्खपणा लक्षात आला. परंतू त्यासाठी बिरबलाला किती टोकाचे धाडस दाखवावे लागले!

सृजनशीलता आणि अभिनवता यावर देशोदेशींच्या अर्थव्यवस्थांचा खूप मोठा भाग अवलंबून असतो. कलाकृतींची निर्मिती करणाऱ्या सर्जनशील उद्योगांचा (दृक्श्राव्य उत्पादने, संरचना, नवमाध्यमे, नाट्यकला, प्रकाशन इ.) यात मोठा वाटा असतो. या क्षेत्रांत सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. या क्षेत्राची निर्यातक्षमता आणि उत्पन्न मिळवून देण्याची ताकद प्रचंड आहे. या सांस्कृतिक क्षेत्रातील उद्योगांच्या बळावर विकसनशील देशांना मोठी आर्थिक झेप घेता येऊ शकते. यात स्त्रिया आणि तरुणांना मोठी संधी असल्याने, शाश्वत विकासोद्दिष्टांच्या – SDG च्या – दृष्टीनेही सृजनशीलता आणि अभिनवता महत्त्वाची आहे.

याच अभिनव विचाराच्या/ नवोन्मेषाच्या बळावर भारतात स्टार्ट अप उद्योग संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्टीनेही बहरत आहेत. तर, कॉर्पोरेट क्षेत्रातील अगदी वरच्या वर्तुळात उच्चपदस्थ व्यक्तींना असेच चौकटीबाहेरचे विचार करण्यासाठी गलेलठ्ठ पगार दिले जातात, हे आपल्याला माहीत आहे. यावरूनच सर्जनशीलता आणि अभिनवता यांचे महत्त्व अधोरेखित होते.

महावीर जयंती

यावर्षी आलेला आजचा दुसरा दिनविशेष म्हणजे, जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती. चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. आध्यात्मिक उन्नतीसाठी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पंचशीलांचा सिध्दान्त त्यांनी मांडला. त्यांनी जगाला अनेकान्तवादाचे तत्त्व शिकवले. एका अर्थी, शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी, चौकटीबाहेर विचार करण्याचा पर्याय त्यांनी मांडला, असे म्हणता येईल. यासाठी आदरणीय भगवान महावीर यांना शतशः अभिवादन!

GW/ML/PGB 21

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *