राज्यातील SBI , LIC कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन.
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. ‘अदानी’ समूहातील गैरकारभाराची चौकशी करावी व जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार ६ फेब्रुवारी रोजी एसबीआय व एलआयसीच्या राज्यातील सर्व कार्यालयांसमोर आंदोलन करणार आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली आहे.
अडाणी यांचे मोदींशी घनिष्ट संबंध
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ट संबंध जगजाहीर आहेत. या संबंधातूनच सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांनी जनतेच्या कष्टाचा पैसा अदानीच्या उद्योग समुहात कसलाही विचार न करता गुंतवला आहे.
विमानतळ, रेल्वे, वीजसेवा, रस्ते, बंदरे यासह देशातील सर्व महत्वाचे सरकारी उद्योग अदानींच्या घशात घातलेले आहेत. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक व सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी मधील जनतेचा पैसाही अदानीच्या खिशात घातला आहे.
अदानीच्या गैरकारभाराचा फुगा आता फुटला असून लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, हा पैसा जनतेचा आहे. एवढा मोठा घोटाळा होऊनही मोदी सरकार, पंतप्रधान आणि अर्थमंत्री गप्प आहेत हे अतिशय लाजीरवाणे व असंवेनशीलपणाचे लक्षण आहे.Congress protest in front of SBI, LIC office in the state.
आम्ही उद्योगपतींच्या विरोधात नाही
काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही पण सर्व नियम, कायदे मोडून एखाद्या उद्योगपतीसाठी रान मोकळे करणे हे देशाच्या हिताचे नाही. खा. राहुल गांधी यांनी सातत्याने अदानीसंदर्भात धोक्याची जाणीव करुन दिली होती.
महिनाभरापूर्वीच राहुल यांनी अदानीचा फुगा फुटेल असे सांगितले होते तरीही मोदी सरकार जागे झाले नाही, आता घोटाळा उघड झाला आहे. काँग्रेस पक्षासह विरोधपक्ष या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत आहेत मात्र मोदी सरकार चौकशीही करत नाही व काही उत्तरही देत नाही.
संसदेत काँग्रेस पक्ष सामान्य जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी आवाज उठवत आहेच पण रस्त्यावर उतरुनही जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहे. ६ फेब्रुवारी रोजी एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राज्यातील सर्व कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे असे पटोले म्हणाले.
ML/KA/PGB
4 Feb. 2023