आज ठरणार नव्या सरकारचा चेहरा मोहरा, रविवारी शपथविधी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचा सरकार स्थापनेचा मुहूर्त अद्याप अनिश्चित होता मात्र काल मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची रात्री उशिरा बैठक होत असून त्यात राज्य मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा निश्चित करण्यात येईल आणि येत्या रविवारी नव्या सरकारचा शपथविधी होईल.
23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गेले चार दिवस महायुतीतील गुप्त संघर्ष सरकारला आकार देण्यास अडथळा ठरत होता. मात्र भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यास स्पष्ट स्पष्ट नकार दिला आणि नमती भूमिका घेण्यास सूचित केले होते त्यानुसार काल शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट करत, आपण भविष्यातले उद्धव ठाकरे ठरणार नाही याची काळजी घेत बिनशर्त माघार घेतली. यानंतर सरकारच्या स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
आज रात्री उशिरा अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची एकत्रित बैठक होऊन त्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि त्यासोबतच मंत्रिमंडळातील जागावाटप तसेच खातेवाटप देखील निश्चित करण्यात येईल. त्यानंतर येत्या रविवारी एक तारखेला वानखेडे स्टेडियम अथवा शिवाजी पार्क इथे भव्य सोहळ्यात नव्या सरकारचा शपथविधी होणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम होण्याची शक्यता असून अन्य धक्का तंत्र यावेळी असणार नाही अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
ML/ML/PGB 28 Nov 2024