तब्बल पंचाहत्तर वर्षांनी भारतात झाला चित्त्यांचा जन्म
भोपाळ, दि. ३०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात चित्त्यांचे पुनरुज्जिवन करण्याच्या विशेष कार्यक्रमांतर्गत, मागील सप्टेंबरपासून नामिबियाहून आठ; तर दक्षिण आफ्रिकेतून १२ असे एकूण २० चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहेत. यापैकी नामिबियाहून आणलेल्या ‘सियाया’ या मादीने चार बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचा जन्म पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे, मात्र वनाधिकाऱ्यांना बुधवारी हे बछडे दृष्टीस पडले.
‘सियाया हिने चार बछड्यांना जन्म दिल्याची आनंदाची बातमी आहे. बाळे-बाळंतीण सुखरूप आहेत. आई झाल्यापासून सियायाने दोन प्राण्यांची शिकारही केली आहे,’ अशी माहिती शेवपूर विभागीय वन अधिकारी पी. के. वर्मा यांनी दिली. चित्त्यांचा गर्भावस्थेचा कालावधी सामान्यत: ९० ते ९३ दिवस असतो. नामिबियाहून चित्ते १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात आणण्यात आले होते.
चित्त्याच्या चार बछड्यांचा जन्म ही भारताच्या वन्यजीव संवर्धनाच्या इतिहासातील ‘अमृतकाळा’तील महत्त्वाची घटना आहे, या शब्दांत केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी या चित्त्यांच्या आगमनाचे स्वागत केले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या बछड्यांचे छायाचित्र ‘ट्वीट’ केले.
ML/KA/SL
30 March 2023