चांद्रयान- ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर, भारताने घडविला इतिहास
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील आजवरची सर्वांत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी आज इस्रोने पार पाडली आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. चंद्राच्या या भागावर वाहन उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चंद्राच्या कोणत्याही भागात वाहन उतरवणारा हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनने हे यश मिळवले आहे.आता सर्वजण विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर येण्याची वाट पाहत आहेत. धूळ स्थिरावल्यानंतर ते बाहेर येईल. विक्रम आणि प्रज्ञान एकमेकांचे फोटो काढून पृथ्वीवर पाठवतील.
चांद्रयान-3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 14 जुलै रोजी 3.35 वाजता प्रक्षेपित करण्यात आले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी 41 दिवस लागले. पृथ्वीपासून चंद्राचे एकूण अंतर 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे.
दक्षिण आफ्रिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे या ऐतिहासिक क्षणाला हजेरी लावली आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी या मोहिमेला यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संपूर्ण टीमचं कौतुक केलं. सोबतच त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे, देशवासियांचे आणि या मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले.
युरोपीय स्पेस एजन्सीने देखील इस्रोचं अभिनंदन केलं आहे. ‘चांद्रयान-3’च्या ट्रॅकिंगसाठी नासासोबतच युरोपच्या अंतराळ संस्थेनेही आपली मदत केली होती.अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानेही इस्रोचं अभिनंदन केलं आहे. नासाचे अॅडमिनिस्ट्रेटर बिल नेल्सन यांनी एक्स पोस्ट केली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश झाल्याबद्दल त्यांनी भारताचं अभिनंदन केलं आहे. या मोहिमेत तुमची साथ देण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही आनंदी असल्याचं ते म्हणाले.
“या क्षणाची आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा करत होतो. आता ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे आम्ही अगदी उत्साही आहोत. मी खूप खुश आहे.” अशी प्रतिक्रिया इस्रोचे माजी प्रमुख के. सिवान यांनी दिली आहे.
SL/KA/SL
23 Aug 2023