चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

 चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज 6 डिसेंबर रोजी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल झालेल्या लाखों भीम अनुयायांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. सकाळ पासून रांगेत उभे राहून तान्हुल्यापासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच बाबाचे दर्शन घेतले.यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून चैत्यभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

करोनामुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंध असल्याने भीमसैनिकांना चैत्यभूमीवर येता आले नाही.मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने 1 तारखे पासूनच भीम अनुयायांचे चैत्यभूमीवर आगमन झाले. चैत्यभूमीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी-शिवाजी पार्कच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे लाखो भीमसैनिक पोलिसांना सहकार्य करताना दिसत होते.

यावर्षी गर्दीचा अंदाज घेऊन शिवाजी पार्क मैदानात पालिकेतर्फे अनुयायांसाठी शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.त्याचबरोबर चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात आले असून समाजमाध्यमांद्वारे देखील थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
शिवाजी पार्क मैदानात पालिकेतर्फे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.पालिकेकडून भोजनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात अली होती. तसेच आंबेडकरी व बिगर आंबेडकरी सामाजिक संघटना ,संस्था यांनी मोफत अन्नदान , फळवाटप, चहा- बिस्किटे, पाणी वाटप केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.
अभिवादनासाठी जवळपास पाच ते सहा तास रांगेने उभ्या असणाऱ्या अनुयायांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पालिका प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला मिळाला.

चैत्यभूमी परिसरात प्रबोधनपर मार्गदर्शन शिबिरे, क्रांतीगीतांच्या ध्वनिफिती, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या साहित्य, महामानवाच्या प्रतीमा व पुतळे खरेदी करण्यासाठी स्टॅालवर गर्दी उसळली आहे. शिवाजी पार्क मैदान व इतरत्र सुमारे ३०० पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले होते. राज्याच्या विविध भागांतून नामवंत प्रकाशन संस्थांनी यात सहभाग घेतला होता. आंबेडकर, बुद्ध, यांसह पुरोगामी विचारधारेची लाखो पुस्तके येथे उपलब्ध होते.परंतु दहा बाय दहाच्या स्टॉलचे दोन दिवसाचे भाडे पाच हजार रुपये असल्याने काही पुस्तक विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ,राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार, जयंत पाटील,

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि अन्य कार्यकर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

ML/KA/PGB
6 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *