पाच लाखांची लाच घेताना सीजीएसटी अधीक्षकाला अटक
मुंबई, दि. २४ : CBI ने आज नरीमन पाईंट येथील एअर इंडिया इमारत कार्यरत असलेले सीजीएसटी ऑडिट-१ चे अधीक्षक अंकित अगरवाल याला एका खासगी कंपनीच्या संचालकाकडून ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. सीबीआयने सांगितले की, कंपनीच्या संचालकाने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे २२ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत असा आरोप करण्यात आला होता की, कंपनीच्या ऑडिटदरम्यान उद्भवलेल्या मुद्द्यांचा निकाल लावण्यासाठी अगरवाल यांनी बेकायदेशीर रकमेची मागणी केली होती.
अगरवाल याने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदाराच्या कंपनीचे ऑडिट केले होते. त्यानंतर त्यांनी ९८ लाख रुपयांची बनावट कर मागणी उभी करण्याची धमकी दिली. हा विषय निकाली काढण्यासाठी त्यांनी २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. चर्चेनंतर ही रक्कम १७ लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. त्यापैकी ५ लाखांचा पहिला हप्ता २२ डिसेंबरला देण्याचे ठरले होते. मात्र, सीबीआयने सीबीआयने सापळा रचून अगरवाल याला ५ लाखांची लाच घेताना अटक केली.