कोरोना विरोधात केंद्र सरकार सज्ज, देशभरात होणार मॉक ड्रील
नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशभरात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वच राज्यांसाठी ही मोठी चिंतेची बाब असून या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री आणि अधिकारी यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या पुढील धोरणांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार १० आणि ११ एप्रिल रोजी मॉक ड्रील होणार असल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे.
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. सध्या राज्यात दररोज दीड लाख कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. गुजरात, तामिळणाडू, महाराष्ट्र, केरळ अशा काही राज्यांमध्ये झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सदर बैठकीत प्रत्येक राज्यासाठी काही गाईडलाइन्स देण्यात आल्या आहेत.
१० आणि ११ एप्रिलला संपूर्ण देशात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. यामध्ये सक्रिय रुग्ण संख्येनुसार आरोग्य यंत्रणा किती प्रमाणात सज्ज आहे ते समजेल. त्यानुसार आरोग्य यंत्रणा वाढवण्यात येईल. एमर्जंन्सी कोवीड प्रिपेडनेस पॅकेजचा निधी अद्याप संपूर्ण संपलेला नाही. त्यामुळे हा निधी त्या त्या ठिकाणी वापरून आणखीन सुविधा निर्माण कराव्यात,अशा सूचना बैठकीत करण्यात आल्याचं भारती पवार म्हणाल्या.
दरम्यान महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्ह रेट हा १० टक्क्यांहून अधिक आहे. राज्यात १० टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्ह रेट असलेल्या जिल्ह्यांची संख्या देखील वाढली आहे. राज्यात अजूनही अनेक ठिकाणी लसीकरण सुरू आहे. ७५ टक्के दोन्ही लसींचे डोस पूर्ण झाले आहेत. मास्कचा वापर करा, पंचसुत्रीचे पालन करा, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
SL/KA/SL
7 April 2023