पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर आता पंतप्रधानांच्या निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठक २ तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएस अजित डोवाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांनी पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत. त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा असल्याचे सांगण्यात आले आहे. गुप्तचर सूत्रांनी सांगितले की, हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद आहे, जो पाकिस्तानात उपस्थित आहे. प्राथमिक तपासात या हल्ल्यात ५ दहशतवादी सहभागी असल्याचे समोर आले आहे. यापैकी दोन स्थानिक आणि तीन पाकिस्तानी दहशतवादी होते.
दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी तातडीने भारतात दाखल झाले आहेत. सर्व सुरक्षा एजन्सिजना सतर्कतेचा इशारा देण्यात आले असून भारतीय सैन्याने काश्मिरमध्ये सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. त्याचबरोबर तेथे अडकलेल्या पर्यटकांना आपापल्या राज्यात सुखरुप पोहोचवण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहे.
SL/ML/SL
23 April 2025