राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही याचिका राज्यसभेत निकाली
 
					
    नवी दिल्ली,22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या दोन्ही गटाने एकदुस—यांच्या पक्षातील खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका राज्यसभेने निकाली काढली. शरद पवार यांच्या राकॉने प्रफुल्ल पटेल यांचे तर अजित पवार यांच्या राकॉने वंदना चव्हाण आणि डॉ. फौजिया खान यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती.
राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये दुफाड झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी पक्षांतर कायद्यानुसार दुस—या गटातील खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याकडे दाखल केली होती. राकॉचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी 20 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यसभा सदस्य नियम 1985 ची कलम 6 (2) अंतर्गत एसपी गटाच्या खासदार वंदना चव्हाण आणि डॉ. फौजिया खान यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. यानंतर 21 नोव्हेंबर 2023 रोजी वंदना चव्हाण यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या निलंबनाची मागणी केली होती.
राज्यसभेचे सभापती धनखड यांनी आज या दोन्ही याचिका निकाली काढल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाने सभापतींना पत्र लिहून त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढे कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली होती. यानंतर धनखड यांनी आज सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणा—या याचिकेची फाईल बंद केली.
महत्वाचे म्हणजे, वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 रोजी तर प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकाळ 27 फेब्रुवारी 2024 रोजी संपला आहे. फौजिया खान 2 एप्रिल 2026 रोजी निवृत्त होणार आहेत. पटेल 3 एप्रिल 2024 ला खासदार म्हणून निवड झाली. ते 2030 पर्यंत राहणार आहेत.
VB/ML/SL
22 March 2025
 
                             
                                     
                                    