डॉ. अजित गोपछडे यांची आयसीएमआरवर सदस्य म्हणून निवड

नवी दिल्ली, 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या आरोग्याचे सुरक्षा कवच समजले जाणा—या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सदस्यपदी खासदार डॉ. अजित गोपछडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल पी. सी. मोदी यांच्या स्वाक्षरीने काल 20 मार्च रोजी काढलेल्या बुलेटिननुसार, राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेवर (आयसीएमआर) तर संजयकुमार झा यांची राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. आयसीएमआर ही वैद्यकीय संशोधन, महामारीशास्त्र आणि भारतातील रोग नियंत्रणाच्या क्षेत्रातील अग्रणी संस्था म्हणून ओळखली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करीत डॉ. गोपछडे म्हणाले की, आयसीएमआर एकप्रकारे देशाच्या आरोग्याचे सुरक्षा कवच आहे. आपल्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत प्राध्यापक आणि विद्याथ्यांना संशोधनासाठी प्रवृत्त करणे, जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ घडविणे, जैवतंत्रज्ञान आणि औषधनिर्मितीच्या क्षेत्रात नवनवे संशोधन आणि कोविडसारख्या कोणत्याही महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम बनविण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
VB/ML/SL
22 March 2025