मालवण येथे होडी बुडाली, तीन मच्छीमार बुडाले, एकाने किनारा गाठला …

सिंधुदुर्ग, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मालवण तळाशील येथील खाडीत मासेमारीस गेलेली नौका बुडून दोन मच्छिमार खाडीत बेपत्ता झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर एक मच्छिमार युवक पोहत किनाऱ्यावर आल्याने तो बचावला आहे.
स्थानिक मच्छिमारानी बेपत्ता मच्छिमारांचा खाडीत आणि समुद्रात शोध सुरू ठेवला आहे. याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील वाडी येथील मच्छिमार किशोर महादेव चोडणेकर (वय ५५), त्यांचा मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय १४) आणि तारकर्ली येथील धोंडीराज परब (वय ५५) काल हे तिघेजण नौकेतून तळाशील खाडीत काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मासेमारीस गेले होते.
मात्र साडे नऊ वाजण्याच्या सुमारास खाडीतील नस्ताच्या ठिकाणी त्यांची नौका बुडाल्याने ते खाडीच्या पाण्यात फेकले गेले. यावेळी किशोर चोडणेकर यांनी त्यांचा मुलगा लावण्य चोडणेकर याला किनाऱ्यावर पोहत जाऊन दुसरी नौका घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार लावण्य हा किनाऱ्यावर पोहत येऊन त्याने नौका बुडाल्याची माहिती स्थानिक मच्छिमारांना दिली. स्थानिक मच्छिमारांनी आपल्या नौकांद्वारे खाडी पात्रात त्यांचा शोध घेतला असता रात्री उशिरापर्यंत ते सापडून आले नाहीत. याबाबत मालवण पोलिसांत खबर देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे .आज सकाळपर्यंत बुडालेली नौका तसेच बेपत्ता असलेल्या दोन्ही मच्छिमारांचा शोध खाडीत आणि समुद्रात सुरु होता. मात्र ते सापडून आले नव्हते.
दोन बेपत्ता मच्छीमारांपैकी धोंडीराज परब यांचा मृतदेह सापडला आहे. समुद्रात जाळ्यांमध्ये अडकलेल्या स्थितीमध्ये हा मृतदेह आढळला. दरम्यान दुसऱ्या बेपत्ता मच्छीमाराचा शोध अद्याप सुरू आहे. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ हा शोध घेत आहेत.
ML/ML/SL
9 June 2024