बीकेसीमध्ये होत आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजची विस्तारित इमारत

 बीकेसीमध्ये होत आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजची विस्तारित इमारत

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जी-ब्लॉकमधील सी-८२ क्रमांकाचा भूखंड नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाला (एनएसई) देण्याच्या निर्णयाला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. एमएमआरडीएच्या भूविक्री नियमावली, १९७७ मधील नियम क्रमांक १६ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, एमएमआरडीएचे अध्यक्ष, एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या १५९व्या प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी सुमारे ४ ते ५ लाख चौ. फूट बांधकाम क्षेत्रफळाच्या अतिरिक्त भूखंडाची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने एमएमआरडीएने एनएसईसारख्या वित्तीय संस्थेचे महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. यापूर्वी, १९९३ साली एमएमआरडीएने जी-ब्लॉकमधील सी-१ क्रमांकाचा भूखंड (१६,०३८.३ चौ. मी. क्षेत्रफळ आणि ३१,०४४.०५ चौ. मी. बांधकाम क्षेत्रफळ) ‘एक्सचेंज प्लाझा’ या एनएसईच्या मुख्यालयासाठी मंजूर केला होता. त्या वेळीही एमएमआरडीएच्या भूविक्री नियमावली, १९७७ मधील काही तरतुदी शिथिल करण्यात आल्या होत्या.

नवीन भूखंड वाटपाचा तपशील :

•    भूखंड क्रमांक : सी-८२
•    क्षेत्रफळ : ५,५०० चौ. मी.
•    अनुज्ञेय एफएसआय : ४.००
•    नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या ना हरकत प्रमाणपत्रानुसार (१८/०९/२०१८) अनुमत उंची : ६९.५२ मीटर
•    बांधकाम क्षेत्रफळ : २२,००० चौ. मी.
•    भाडे करार कालावधी : ८० वर्षे
•    वापर : नॅशनल स्टॉक एक्सचेंजसाठी नवीन प्रशासकीय इमारत (व्यावसायिक वापर)
•    भाडे करार शुल्क (प्रीमियम) : ₹७५७.९० कोटी
•    

या भूखंडावर अनुज्ञेय एफएसआय ४.०० पेक्षा अधिक बांधकाम क्षेत्रफळ विकसित करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या १९ जुलै, २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार, एनएसईने एमएमआरडीएकडे आवश्यक प्रीमियम भरल्यास त्यांना अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळ मिळू शकेल. वांद्रे-कुर्ला संकुलातील सी-८२ क्रमांकाचा भूखंड एनएसईला देण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावास उपमुख्यमंत्री, आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष यांच्या मान्यतेनंतर प्राधिकरणाच्या कार्योत्तर मंजुरीच्या अटीवर ही मंजुरी देण्यात आली.

या मंजुरीनंतर एमएमआरडीएतर्फे ७ मार्च, २०२५ रोजी एनएसईला अधिकृत ऑफर लेटर जारी करण्यात आले. या अतिरिक्त क्षेत्रफळाच्या वाटपामुळे एनएसईच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि बीकेसीमधील व्यावसायिक क्षेत्राच्या विकासालाही चालना मिळेल. नव्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीमुळे देशातील एक आघाडीचे आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र म्हणून बीकेसीचे स्थान अधिक भक्कम होईल.

ML/ML/PGB 6 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *