कोकणात आज झाले लाडक्या बाप्पाचे आगमन

सिंधुदुर्ग /रत्नागिरी, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकणातला अत्यंत लाडका समजला जाणारा उत्सव तसेच वर्षभर चैतन्याची बेगमी, संचित करायला लावणारा मांगल्याचा महामेरू ठरणारा गणेशोत्सव कोकणभरात आजपासून उल्हासित वातावरणात सुरू झाला आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 71,789 घरांमध्ये तसेच 31 ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात गणेशाचे आगमन आज होत आहे . गेले काही दिवस दडी मारून असलेला पर्जन्य राजा देखील गणेशोत्सवाच्या या पर्वा मध्ये पुनःश्च रुजू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .
आज सिंधुदुर्गवासीयांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत उत्साहात केले . घरांमध्ये केलेल्या सुंदर मखरांमध्ये गणराय विराजमान झाले . बाप्पाचे हे आगमन कुठे डोक्यावरून , तर कुठे वाहनांमधून तर कुठे चक्क पालखी मधून होत आहे . बाप्पाला नैवेद्य म्हणून बाप्पाचा लाडका मोदक दाखवला गेला . गणेशाच्या वास्तव्याच्या काळात घराघरांमध्ये आता आरत्या आणि भजनाचे स्वर उमटणार आहेत .पुढील काही दिवस संपूर्ण जिल्हा भक्तीभावपूर्ण वातावरणात तल्लीन होऊन जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गणपती आगमनाला सुरुवात झाली. रत्नागिरी नजिकच्या तोणदे गावात नदी पार करत होडीतून गणपती बाप्पाचे आगमन होते. याठिकाणी काजळी नदीच्या पात्रातून ढोल ताश्याच्या गजरात गणपती आणले जातात. पूर्वीच्या काळी दणळवळणाची साधने नव्हती. त्यामुळे गणपती कसे घरी आणले जायचे हे पुढच्या पिढीला कळण्यासाठी याठिकाणी होडीतून गणपती आणण्याची परंपरा आहे.
कोकणातल्या खाडी किनाऱ्यावरील खारवी समाज सुद्धा अश्याच पद्धतीनी होडीतून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन येतो.
ML/KA/SL
19 Sept. 2023