रेल्वेच्या धडकेत अस्वलाची दोन पिल्ले ठार

चंद्रपूर दि ३१:- रेल्वेच्या धडकेत अस्वलाची दोन पिल्ले ठार झाल्याची घटना चिचपल्ली वनविभागांतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील उपक्षेत्र केळझर, नियतक्षेत्र सांडाळा अंतर्गत मौजा केळझर येथील कक्ष क्रमांक ४३२ मध्ये रात्रीच्या सुमारास
चंद्रपूर-गोंदिया रेल्वे लाईनवर रेल्वे पोल क्रमांक १२१४/१३ ते १२१४ च्या मधोमध घडली. यात प्रत्येकी एक नर व मादीचा समावेश आहे. चंद्रपूर ते गोंदिया रेल्वे लाईनवर मोठ्या प्रमाणात रेल्वे धावतात. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेलाईनच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर दिसून येतो.
दरम्यान, अस्वलाची पिल्ले नर , मादी यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच चंद्रपूर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक व्ही.एस. तरसे यांच्या मार्गदर्शनात चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेशकर, केळझरचे क्षेत्र सहाय्यक यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. टीटीसीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार यांनी मृत अस्वलाच्या पिल्लाचे मध्यवर्ती काष्ठ भांडार चिचपल्ली येथे शवविच्छेदन केल्यानंतर दहन केले.ML/ML/MS