निफ्टी २६ हजारांच्या उंबरठ्यावर, पण महागाई आणि जागतिक घडामोडींचे आव्हान!
जितेश सावंत
FII खरेदी, कच्च्या तेलाचे दर, रुपयाची सुधारणा आणि अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी ठरवणार बाजाराची पुढील दिशा
भारतीय शेअर बाजाराने सलग चार आठवडे तेजी कायम ठेवत नऊ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठवड्यात निफ्टी ५० मध्ये २.६१ टक्के, तर सेन्सेक्समध्ये २.८५ टक्क्यांची वाढ झाली. निफ्टी २५,८००.६० वर, तर सेन्सेक्स ८३,९१९.७१ वर बंद झाला. बँकिंग समभागांमधील तेजी, परदेशी गुंतवणूकदारांची मोठी खरेदी, रुपयाची सुधारणा आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील घसरण यामुळे बाजाराला आधार मिळाला. आता निफ्टी २६,००० च्या महत्त्वाच्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना आगामी आठवड्यातील काही घडामोडी निर्णायक ठरू शकतात.
FII खरेदीचा जोर; मात्र DII ची विक्री
नोव्हेंबर महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारात आतापर्यंत सुमारे ₹१.१२ लाख कोटींची निव्वळ खरेदी केली आहे. ही खरेदी बाजारातील तेजीचा महत्त्वाचा आधार ठरली आहे. मात्र, याच काळात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) सुमारे ₹६१,७८७ कोटींची निव्वळ विक्री केल्याचे आकडेवारीतून दिसते.
जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकेतील बॉण्ड यील्ड आणि डॉलरची दिशा यांचा परदेशी गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो.
महागाईचा वाढता दबाव आणि RBI चे व्याजदर धोरण
भारतीय बाजारासमोरील एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे वाढती महागाई. ऑक्टोबर महिन्यातील किरकोळ महागाईचा दर ६.०९ टक्क्यांवर पोहोचला असून तो रिझर्व्ह बँकेच्या ६ टक्क्यांच्या उच्च मर्यादेपेक्षा अधिक आहे. अन्नधान्य महागाई ८.९४ टक्क्यांवर असल्याने चिंता वाढली आहे.महागाई उच्च पातळीवर कायम राहिल्यास RBI ला व्याजदर कपातीबाबत सावध भूमिका घ्यावी लागू शकते. डिसेंबरमधील पतधोरण बैठकीत व्याजदरवाढीची शक्यताही विचारात घेतली जाऊ शकते. याचा परिणाम गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांवर होऊ शकतो.
कच्चे तेल आणि रुपयाची सुधारणा
ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल ८१ ते ८४ डॉलरच्या आसपास आल्याने भारताच्या आयात खर्चाबाबत दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी रुपया प्रति डॉलर ९२.७० च्या आसपास सुधारला आहे. कमी तेलदर आणि मजबूत रुपया हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत आहेत. मात्र, तेलाच्या किमती पुन्हा वाढल्यास आयात खर्च, महागाई आणि कंपन्यांच्या नफ्यावर दबाव येऊ शकतो.
अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी आणि AI क्षेत्रातील अस्थिरता
आगामी आठवड्यात अमेरिकेतील PCE महागाई निर्देशांक, तिसऱ्या तिमाहीतील GDP ची सुधारित आकडेवारी आणि नोव्हेंबर महिन्याचे प्राथमिक PMI आकडे जाहीर होणार आहेत. या आकडेवारीवरून अमेरिकेतील आर्थिक स्थिती आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाचे संकेत मिळतील.
दुसरीकडे, अमेरिकेतील AI आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे जागतिक बाजारात अस्वस्थता निर्माण झाली आहे. AI क्षेत्रातील प्रचंड गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळेल का, याबाबत गुंतवणूकदार प्रश्न उपस्थित करत आहेत. Nasdaq मधील घसरणीचा परिणाम भारतीय IT कंपन्यांच्या समभागांवरही होऊ शकतो.
बँकिंग क्षेत्र, निकाल आणि F&O एक्स्पायरी
गेल्या आठवड्यात बँकिंग समभागांनी बाजाराला चांगला आधार दिला. निफ्टी २६,००० च्या दिशेने जात असताना बँकिंग क्षेत्रातील तेजी टिकते का आणि बाजारातील इतर क्षेत्रांमध्येही खरेदी वाढते का, हे पाहावे लागेल. कंपन्यांच्या आगामी तिमाही निकालांमध्ये नफ्याचे प्रमाण आणि वाढता उत्पादन खर्च यांचाही विचार महत्त्वाचा ठरेल.याशिवाय २३ नोव्हेंबर रोजी होणारी मंथली Futures & Options (F&O) एक्स्पायरी ही अल्पकालीन व्यवहारांच्या दृष्टीने महत्त्वाची घटना असेल. एक्स्पायरीच्या पार्श्वभूमीवर निर्देशांकांमध्ये चढ-उतार वाढू शकतात.
तांत्रिक विश्लेषणानुसार निफ्टीचा कल सध्या सकारात्मक आहे. पण बाजार ओव्हरबॉट झोन मध्ये आहे. २५,५०० हा महत्त्वाचा सपोर्ट आहे या पातळीच्या वर निर्देशांक टिकल्यास २५९५३-२६,००० पर्यंत जाण्याची शक्यताआहे. .निफ्टी २५,५०० च्या खाली घसरल्यास तेजीला काही प्रमाणात विराम मिळू शकतो.त्यानंतर निफ्टी करिता २५३६८-२५३४५-२५०४८-२४९३४-२४८९६ हे म्हत्वाचे सपोर्ट आहेत.
सलग चार आठवड्यांच्या तेजीमुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी, रुपयाची सुधारणा आणि कमी कच्च्या तेलाचे दर बाजारासाठी अनुकूल आहेत. मात्र, वाढती महागाई, अमेरिकेतील व्याजदरांचे संकेत आणि जागतिक तंत्रज्ञान समभागांमधील अस्थिरता ही आव्हाने कायम आहेत.
निफ्टीची २६,००० चा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल जरी असली , तरी या तेजीला पुढे नेण्यासाठी केवळ परदेशी खरेदी नव्हे, तर कंपन्यांच्या नफ्यातील वाढ आणि आर्थिक परिस्थितीतील स्थैर्यही आवश्यक असेल.
सध्याच्या अस्थिर आणि अनिश्चित बाजारपेठेत गुंतवणूकदारांनी अत्यंत सावधगिरीने पावले उचलावीत आणि अल्पकालीन तेजीच्या मोहापेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे
लेखक
शेअर बाजार, अर्थविषयक घडामोडी, सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्शन कायदा तज्ज्ञ.
The author is an expert in the stock market, financial affairs, cyber law, and data protection law. ML/ML/MS