राष्ट्रीय बालिका दिन : शक्तिरूप स्त्रीने स्वतः चे सामर्थ्य ओळखावे
मुंबई, दि. 24 (राधिका अघोर) :24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षांनुवर्षे बालिकांना जगात अनेक ठिकाणी दुय्यम स्थान दिले गेले, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागला. त्यांना सामान हक्क आणि संधी मिळावी, याबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. विविध उपक्रम राबवले जातात.
तसं तर आजच्या आधुनिक जगात महिलांना समान संधी आणि हक्क मिळाले आहेत, त्यांना संरक्षण देणारे कायदेही आहेत. अशावेळी हा दिवस साजरा करणं कदाचित गैरलागू वाटू शकेल किंवा तो केवळ एक उपचार असल्याची भावना येऊ शकेल. मात्र, शहरी भागात महिलांची, मुलींची परिस्थिती आज सुधारली असली, तरी ग्रामीण भागात आजही त्यांना आपल्या हककांसाठी संघर्ष करावा लागतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, त्यामुळे त्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. हे टाळण्यासाठी, विविध उपाय योजना सातत्याने केल्या जात आहेत. एकीकडे मुलींच्या शिक्षणासाठी सामाजिक जनजागृती तर दुसरीकडे सरकारी पातळीवर उपाय सुरू आहेत.
देशातल्या सर्व शाळां मधे मुलींसाठी शौचालये बांधल्यामुळे त्यांचं शाळा सोडण्याचं प्रमाण कमी झालं. घरोघरी नळ पोहोचवण्याच्या योजनेमुळे गावागावातल्या मुलींना लांबून पाणी भरून आणण्याची जबाबदारी कमी झाली, त्यांचा वेळ वाचला आणि त्यामुळे त्या शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रीत करू शकतात. ह्या योजनेचा लाभही मुलींना सक्षम करण्यात होतो आहे.
बेटी बचाओ, बेटी पढाओ, ही मोहीमही मुलींच्या सक्षमीकरणासाठी महत्वाची ठरते आहे. स्त्री भ्रूण हत्या पूर्णपणे थांबल्या नसल्या तरी त्या कमी करण्यात बरेच यश मिळाले आहे. मागास वंचित समजातल्या मुलींचाही शिक्षणातला टक्का वाढला आहे.
शहरातल्या मुलींना सोयी सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध आल्या तरी, त्यांचे प्रश्न ही बिकट आहेत. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सुरक्षितता. मुलींना सुरक्षित वातावरण असावं अशी व्यवस्था आपण उभारायला तर हवीच; पण त्या सोबत त्यांना अत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण ही द्यायला हवे. मुलींना नाजूक म्हणून वाढविण्यापेक्षा त्यांना कणखर, मजबूत आणि निरोगी म्हणून वाढवायला हवे. त्यांना स्व संरक्षणासाठी कुणाचीही मदत घेण्याची वेळच येणार नाही, असं त्यांचं संगोपन करायला हवे.
शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर. आपण दुय्यम आहोत, अशी मानसिकता मुलींच्या मनात निर्माण व्हायला त्यांचं संगोपन, जडणा घडण महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे, मुलींचं संगोपन करताना, त्यांना मुलासारखे वाढवू नये, मुलगी म्हणूनच कणखर स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्याचे संस्कार त्यांच्यावर केले जावेत. तरच राष्ट्रीय बालिका दिना साजरा करण्यामागचा उद्देश यशस्वी होईल.
सर्व मुलींना बालिका दिनाच्या शुभेच्छा!
ML/ML/PGB 24 Jan 2025