‘पठाण’विरोधात आता बजरंग दल आक्रमक
मुंबई, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘पठाण’ चित्रपटाविरोधात आता बजरंग दल आक्रमक झाले असून त्यांनी शाहरुख खानचे पोस्टर्स फाडत मॉलमध्ये तोडफोड केली आहे. Bajrang Dal is now aggressive against ‘Pathan’
शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे दोन आठवडे बाकी आहेत. पण त्यातील ‘बेशरम रंग’ गाण्यापासून सुरू झालेल्या वादानंतर चित्रपटाला अजुनही हिंदू संघटनांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. ‘पठाणला आता गुजरातमधील अहमदाबादमध्ये जोरदार विरोध होत आहे. शहरातील एका मॉलमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर्स फाडली आहेत.
४ जानेवारीला अहमदाबादमधील अल्फावन मॉलमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘पठाण’ चित्रपटाचा जोरदार विरोध केला. तसेच त्यांनी मॉलमध्ये लावण्यात आलेली शाहरुख खानची पोस्टर्स फाडली. बजरंग दलचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी मॉलमध्ये ‘पठाण’चे पोस्टर फाडत आणि घोषणाबाजी केली. मॉलमध्येही त्यांनी तोडफोड केली आणि ‘पठाण’ रिलीज न होऊ देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या गोंधळावर बजरंग दलाचे अध्यक्ष ज्वलित मेहता यांनी प्रतिक्रिया दिली. “दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या कपड्यांना आमचा विरोध आहे. ‘पठाण’ हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देतो. त्यामुळे आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
या गोंधळानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं , नंतर त्यांना सोडून देण्यात आलं.
दरम्यान, १२ डिसेंबर रोजी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीवरून वाद निर्माण झाला आहे. ‘भगवा’ रंग हे हिंदू धर्माच्या श्रद्धेचं प्रतीक असल्याचं बजरंग दल, हिंदू महासभा अशा अनेक संघटनांचं म्हणणं आहे. दीपिका पदुकोणने भगवी बिकिनी घालून हिंदू धर्माचा अपमान केला आहे, असं ते म्हणत आहेत. यानंतर सेन्सॉर बोर्डानेही या गाण्यात बदल सुचवले होते, पण निर्मात्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ML/KA/PGB
05 Jan. 2023