अशोक भांगरे यांचे निधन

 अशोक भांगरे यांचे निधन

अहमदनगर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक यशवंतराव भांगरे (वय ६०) यांचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले.

भांगरे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना काल सायंकाळी शेंडी येथून एसएमबीटी हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र, तेथे जाण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. हॉस्पिटल व्यवस्थापनाने या वृत्तास दुजोरा दिला. ही बातमी अकोले तालुक्यात समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भांगरे यांनी संघर्षातून आपले राजकारण उभे केले होते. ते कृषी पदवीधर होते. पाच विधानसभा निवडणुका त्यांनी लढविल्या. त्यात त्यांनी निकराची लढत दिली. त्यांना मोठा जनाधारही होता. संयमी आणि सर्वांशी सलोख्याने वागणे हा त्यांचा स्वभाव होता.

अकोले पंचायत समितीचे सभापती, समाजकल्याण समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, दोन विवाहित मुली, मुलगा जिल्हा बँकेचे संचालक अमित, बंधू दिलीप असा मोठा परिवार आहे. भांगरे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होतील, असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले.

आमदार डॉ. किरण लहामटे हे अहमदाबादला दौऱ्यावर निघाले होते. मात्र, त्यांना हे वृत्त समजताच ते अकोल्यात परतले. अकोले आणि अहमदनगर जिल्ह्यासाठीही ही अत्यंत दु:खद बातमी असून एक लढवय्या नेता आपण गमावला असल्याची भावना आ. डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केली.

ML/KA/SL

13 Jan. 2023

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *