अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी

 अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी

नवी दिल्ली, दि. २५ : जनआंदोलनासमोर नमते घेत केंद्र सरकारने अखेर राज्यांना अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यां संपूर्ण बंदी घालण्याचे आणि संरक्षित क्षेत्रे (protected zones) विस्तारित करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ 100 मीटर उंचीवरील पर्वतरांगा मानल्या जातील या अरवलीच्या नवीन व्याख्येवर झालेल्या आंदोलनानंतर कारवाई करण्यात आली. या निर्णयाचा उद्देश दिल्लीपासून गुजरातपर्यंत पसरलेल्या जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगापैकी एक असलेल्या अरवलीचे संरक्षण आणि जतन करणे हा आहे.

सदर निर्देशामुळे गुजरातपासून राष्ट्रीय राजधानी क्षेत्रापर्यंत (NCR) पसरलेल्या अरावलीला अखंड भूवैज्ञानिक कणा (continuous geological ridge) म्हणून जपले जाईल आणि संपूर्ण प्रदेशातील अनियमित खाणकामावर नियंत्रण येईल. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन (ICFRE) ला पर्यावरणीय, भूवैज्ञानिक आणि लँडस्केप-स्तरीय मूल्यांकनांवर आधारित खाणकाम करण्यास मनाई असलेले पुढील झोन (क्षेत्रे) ओळखण्याचे निर्देश दिले आहेत.

सध्या कार्यरत असलेल्या खाणींसाठी, राज्य सरकारांना पर्यावरणाच्या संरक्षणाचे कठोर पालन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले की, विशेषत: मुख्य, संरक्षित आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रांमध्ये, ज्यात एनसीआरचा समावेश आहे, कोणत्याही नवीन खाणपट्ट्यांना परवानगी दिली जाणार नाही सर्वोच्च न्यायालयाने अरावलीची एक नवीन व्याख्या स्वीकारली आहे, ज्यानुसार अरावली जिल्ह्यांमधील स्थानिक भूभागापासून 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या कोणत्याही भूभागास अरवली हिल्स म्हणून वर्गीकृत केले जाते. या नवीन व्याख्येमुळे जनआक्रोश सुरु होता. कारण बहुतेक भूभाग 100 मीटरच्या मर्यादेखाली येत असल्याने, 90 टक्क्यांपेक्षा जास्त पर्वतरांग खाणकामासाठी खुली होऊ शकते, अशी भीती आहे.

राजस्थानसाठी अरवली पर्वतरांगेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा प्रदेश थार वाळवंट आणि पूर्व भारत यांच्यामध्ये एक नैसर्गिक अडथळा म्हणून काम करतो. तज्ञांच्या मते, अरवली पर्वतरांगांच्या उपस्थितीमुळे राजस्थानातील अनेक भाग पूर्णपणे वाळवंट होण्यापासून रोखले जाते. या टेकड्या मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग कमी करतात, ज्यामुळे पाऊस पडतो आणि भूजल पुनर्भरणात महत्त्वाची भूमिका बजावतात.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *