अंगणवाडी सेविकांनी रोखला महापालिकेसमोरचा रस्ता
मुंबई दि.3( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील आझाद मैदानात राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्याभरापासून राज्य सरकारविरोधात राज्यव्यापी संप पुकारला आहे. आज संतप्त झालेल्या या सेविकांनी मुंबई महापालिका मुख्यालया समोरचा रस्ता रोखून धरला होता.
अंगणवाडी सेविकांना 26 हजार तर मदतनीसांना 20 हजार मानदान द्यावे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, महागाई, अन्य भत्ते, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन इत्यादी मागण्यांसाठी हा संप सुरु आहे.अद्यापही संपकरी महिलांच्या मागण्यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. सरकार केवळ आश्वासन देते, कृतिआराखडा देत नाही. केवळ आश्वासनांनी पोट कसे भरणार, असे विचारत आशासेविकांप्रमाणे आम्हाला मानधनवाढ कधी मिळणार, असा प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती’ने जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान अंगणवाडी सेविकांनी मुंबई महानगर पालिकेच्या समोरील रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी करीत रस्ता रोको आंदोलन केले. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली.यावेळी उध्दव ठाकरे यांनी , तुम्ही सावित्रीच्या लेकी आहेत. क्रांती ज्योतिच्या ज्योती तुमच्यात तेवतात की नाही? असा प्रश्न करताना असंख्य ज्योती जेव्हा पेटतात तेंव्हा निर्माण होणारी मशाल सत्ता पालटून टाकते एवढी ताकद तुमच्यात आहे.सरकारकडे आपली जाहिरात करण्यासाठी पैसा आहे. पण राज्यात तळागाळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचार्यांना त्यांना मेहनतीचे पैसे द्यायला निधी नाही,अशी टीका ही ठाकरे यांनी सरकारवर केली.
आजही राज्यात अनेक बालक आहेत कुपोषणात आहेत. तर, दुसरीकडे गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो आपण जाहिरातीवर पाहतोय.हे खेकडे खाऊन गुटगुटीत झालेले मंत्री आहेत अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री यांचे नाव न घेता केली. ज्योतीमध्ये शांतपणा पण असतो मात्र असंख्य ज्योति एकत्र येतात तेव्हा मशाल पेटते. मी आज तुमच्यासोबत नेता म्हणून नाही भाऊ म्हणून आलो असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ML/KA/SL
3 Jan. 2024