पोलिसांच्या मदतीला १ लाख गणसेवकांची फौज

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सव तोंडावर आला असताना नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मुंबई आणि राज्यभरातील पोलीस सुसज्ज होत आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाला होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे मुंबई पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असतो.यावर्षी मुंबई पोलिसांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यंदा गणेशोत्सवादरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी मुंबईतील प्रत्येक गणेश मंडळांमध्ये गणसेवक नियुक्त केले जाणार आहेत.छोट्या गणेशोत्सव मंडळातील १० तर मोठ्या गणेशोत्सव मंडळातील २० असे मुंबईत एकूण एक लाख गणसेवक काम करतील. जवळपास एक लाख गणसेवक आपापल्या मंडळाच्या मंडप आणि आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवतील. गणेश मंडपाजवळ एखादं संशयास्पद वाहन उभं असेल तर याची माहिती तातडीने पोलिस दलाला देतील.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तयारी सुरू झाली असून हजारो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.पोलिसांच्या मदतीला गणसेवक नेमण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.मुंबईमध्ये गणेशोत्सव काळात एक लाख गणसेवकांची फौज बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून तयार करण्यात येणार आहे. गणेश मंडळात नियुक्त असलेल्या गणसेवकांना पोलिसांकडून ओळखपत्र देखील देण्यात येईल.
गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पोलिसांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबईचा गणेशोत्सव जोरदार साजरा व्हावा आणि हा उत्सव साजरा करताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अधिक सज्ज राहावे यासाठी समितीने हा प्रस्ताव मुंबई पोलिसांकडे ठेवला होता. गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात पोलीस आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राहावा,पोलिसांना सहकार्य मिळावे तसेच सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
SL/KA/SL
12 Sept. 2023