अमुलचे दूध महागले
मुंबई,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेट्रोल,डिझेल आणि गॅस दर वाढीमुळे अगोदरच त्रस्त झालेल्या ग्राहकांना आता दूध दर वाढीचाही सामना करावा लागणार आहे. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीच ग्राहकांना भाववाढीचा धक्का बसला आहे. अमूलच्या दुधाचे दर 3 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. अमूलने त्याबाबतची माहिती दिली आहे. दूधाचे दर 3 रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आले आहेत. आजपासूनच हे दुधाचे नवे दर लागू करण्यात येणार असल्याचं अमूलने स्पष्ट केलं आहे.
अमूल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार अमूलचे ताजे अर्धा लिटर दूध 27 रुपयांनी मिळणार आहे. तर एक लिटरचं पिशीवी 54 रुपयाला मिळणार आहे. अमूल गोल्ड म्हणजे फूल क्रीम दूधाची अर्धा लिटरची पिशवी 33 रुपयांना मिळणार आहे. तर एक लिटरची पिशवी 66 रुपयांना मिळणार आहे.
गाईचे दूधही महागले
अमूलच्या गायीच्या दुधाची किंमतही वाढवण्यात आली आहे. अमूलच्या गायीच्या एक लीटर दुधाची किंमत 56 रुपये करण्यात आली आहे. तर अर्धा लीटर दुधाची किंमत 28 रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हशीच्या A2 दूध आता 70 रुपये प्रति लिटर मिळणार आहे. तसेच अमूल दहीसह इतर उत्पादनाचे भावही वाढले आहेत.
कॉंग्रेसकडून टिका
दरम्यान या दरवाढी बाबत काँग्रेसने भाजपवर जोरदार टिका केली आहे. अच्छे दिनचा हवाला देऊन ही टीका केली आहे. काँग्रेसने याबाबतचं ट्विट केलं आहे. वर्षभरात अमूलचं दूध 8 रुपये प्रति लिटरने महागलं आहे.
3 Feb. 2023