भारताच्या GDP च्या 10% आहे अंबानी कुटुंबाची संपत्ती
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या भव्य विवाहसोहळ्याने जगभरातील लोकांचे डोळे विस्फारले होते. महिनाभराहून अधिक काळ हा विवाह समारंभ माध्यमांतून गाजत होता. त्यानंतर आता अंबानी कुटुंबाच्या संपत्तीबाबत एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.
बार्कलेज-हुरुन इंडियाच्या सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसाय 2024 च्या यादीनुसार, अंबानी कुटुंबाचे मूल्य ₹25.75 ट्रिलियन आहे, जे भारताच्या GDP च्या सुमारे 10% आहे.
बार्कलेज-हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली कौटुंबिक व्यवसायाचे साम्राज्य ऊर्जा, किरकोळ आणि दूरसंचार क्षेत्रात कार्यरत आहे. बार्कलेज-हुरुन इंडियाचे हे रँकिंग 20 मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या मूल्यांकनावर आधारित आहे.
या मूल्यांकनामध्ये खाजगी गुंतवणूक आणि लिक्विड असेट्स समाविष्ट नाहीत. अंबानींच्या संपत्तीच्या मूल्यामध्ये रिलायन्स, जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि इतर समूह कंपन्यांमधील स्टेक समाविष्ट आहेत.
बजाज फॅमिली सर्वात मौल्यवान कौटुंबिक व्यवसायांच्या यादीत ₹7.13 ट्रिलियन मूल्यासह दुसऱ्या स्थानावर आहे. अहवालानुसार, पुण्यातील ऑटोमोबाईल व्यवसायाचे नेतृत्व कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे नेते नीरज बजाज करत आहेत.
या यादीत बिर्ला कुटुंब ₹ 5.39 ट्रिलियन मूल्यासह तिसऱ्या स्थानावर आहे. या कंपनीचे नेतृत्व कुटुंबातील चौथ्या पिढीतील कुमार मंगलम बिर्ला करत आहेत. ही कंपनी धातू, खाणकाम, सिमेंट आणि वित्तीय सेवांवर लक्ष केंद्रित करते.
SL/ ML/ SL
9 August 2024