आता तळीरामांची पंचाईत
नवी दिल्ली,दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एअर इंडियाच्या सुधारित धोरणानुसार, आता प्रवाशांना केबिन क्रूनं सेवा दिल्याशिवाय मद्यपान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.त्यामुळे आता तळीरामांची पंचाईत होणार आहे.
अलीकडच्या काळात विमानातील प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एअर इंडियानं (Air India) आपल्या फ्लाईटमध्ये अल्कोहोल सर्व्ह करण्याबाबतच्या धोरणात बदल केला आहे. सुधारित धोरणानुसार, आता विमान प्रवासात प्रवाशांना मर्यादित (Limited) प्रमाणात दारू देण्यात येणार आहे. काल पासून (24 जानेवारी) सुधारित धोरणाशी संबंधित बाबी लागू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघुशंका केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर प्रवाशाचा शोध सुरू केला. अखेर काही दिवसांनी आरोपीला अटक करण्यात आली. शंकर मिश्रा कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या वेल्स फार्म या अमेरिकन बहुउद्देशीय वित्तीय सेवा इंडिया चापटर कंपनीचा उपाध्यक्ष देखील आहे. लघुशंका प्रकरण उघडकीस आल्यावर आता कंपनीने त्याला कामावरून कमी केले आहे.
SL/KA/SL
25 Jan. 2023