अजित पवार गटाला मिळाले राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा ताबा

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घटना आज घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हा अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदार आणि खासदारांसह अजित पवार हे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांनी दावा केला होता. मुळ पक्ष कोणाचा यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. गेल्या ६ महिन्यात यासंदर्भात १० सुनावणी झाल्यानंतर अखेर आयोगाने हा निर्णय दिला.
निवडणूक आयोगाचा हा निर्णय मी नम्रपणे स्वीकारतो. आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत! असे अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे या पोस्टच्या खाली त्यांनी अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा उल्लेख केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबध्द होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जनतेला दिला.
उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आता शरद पवार यांना पक्ष आणि चिन्ह गमवावे लागले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान मूळ पक्षातून मोठ्या संख्येने बाहेर पडून पक्षावर ताबा मिळवण्याच्या या घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात मोठ्या उलथापालथी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. या साऱ्यातून पक्षाध्यक्ष अधिक सावध होऊन पक्षांतर्गत नियमांमध्ये कठोरता आणण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो.
SL/KA/SL
6 Feb. 2024