#एअर इंडियासाठी कंपनीचे 209 कर्मचारी आणि टाटा समुहाने दाखल केल्या निविदा

 #एअर इंडियासाठी कंपनीचे 209 कर्मचारी आणि टाटा समुहाने दाखल केल्या निविदा

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तोट्यात असलेली विमान कंपनी एअर इंडियाच्या संपादनासाठी टाटा समुहासह अनेक कंपन्यांनी प्रारंभिक निविदा दाखल केल्या आहेत. दरम्यान, एअर इंडियाच्या 209 वरिष्ठ कर्मचार्‍यांनीही या निविदेमध्ये भाग घेतला आहे. दुसरीकडे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव (दीपम) तुहीन कांत पांडेय यांनी ट्विट केले की एअर इंडियाच्या रणनितिक निर्गुंतवणुकीसाठी अनेक स्वारस्यपत्रे मिळाली आहेत. आता हा व्यवहार दुसर्‍या टप्प्यात जाईल. परंतू त्यांनी संपादनासाठी निविदा भरणार्‍यांची नावे उघड केली नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा समुहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सने सोमवारी मुदत संपण्यापूर्वी स्वारस्यपत्र दाखल केले. परंतू टाटा यांनी एकट्यानेच निविदा भरली की इतरांसह भरली हे समजू शकलेले नाही. एका अधिकार्‍याने सांगितले की व्यवहार सल्लागार 6 जानेवारीपूर्वी ज्यांची निविदा पात्र असेल अशा निविदाकारांना सूचना देतील. त्यानंतर पात्र निविदाकारांना आर्थिक निविदा दाखल करण्यास सांगितले जाईल.
209 कर्मचार्‍यांच्या एका गटाने अमेरिकेतील एक खाजगी इक्विटी कंपनी, इंटरुप्स इंक यांच्यासोबत 50 टक्के भागीदारीसाठी निविदेत भाग घेतला आहे. अमेरिकन कंपनीचे अध्यक्ष लक्ष्मी प्रसाद यांनी याची पुष्टी केली आहे. जर हे यशस्वी झाले तर एखादी सरकारी कंपनी त्याच्या स्वत:च्याच कर्मचार्‍यांनी खरेदी करण्याचे हे देशाच्या कॉर्पोरेट इतिहासामधील पहिलेच प्रकरण असेल.
कर्जबाजारी एअर इंडिया खरेदी करण्यासाठी टाटा समूहाने स्वारस्यपत्र सादर केले आहे. असे मानले जात आहे की टाटाने यासाठी एअर एशिया इंडियाचा वापर केला आहे, ज्यामध्ये टाटा सन्सचा जास्त हिस्सा आहे. परंतु, एअर एशिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भास्करन यांनी यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला. जर हा व्यवहार निश्चित झाला तर विमान कंपनी 67 वर्षानंतर ‘स्वगृही’ परतू शकेल. टाटा समुहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडिया ची सुरूवात केली होती, जी भारत सरकारने 1953 मध्ये आपल्या ताब्यात घेतली.
एअर इंडियामधील आपला 100 टक्के हिस्सा विकण्यासाठी सरकारने निविदा मागविल्या आहेत. यासोबतच एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमधील एअर इंडियाचा 100 टक्के हिस्सा देखील विकला जाईल. एअर इंडिया एसएटीएस एअरपार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमधील 50 टक्के हिस्सा विकला जाईल. सध्या एअर इंडियावर 60,074 कोटींचे कर्ज आहे, परंतु संपादनानंतर खरेदीदाराला 23,286.5 कोटी रुपयेच फेडावे लागतील. उर्वरित कर्ज विशिष्ट हेतूसाठी तयार केलेल्या एअर इंडिया अ‍ॅसेट होल्डिंग्ज लिमिटेडकडे हस्तांतरित केले जाईल. याचा अर्थ उर्वरित कर्ज सरकार स्वतःच फेडेल.
Tag-Air India/Tata group/Workers/Tender
PL/KA/PL/16 DEC 2020

mmc

Related post