आदिशक्ती संत मुक्ताई मातेची पालखी पंढरपूरकडे रवाना

जळगाव, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशी निमित्त मानाचे स्थान असलेल्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईंचा पादुका पालखी सोहळ्याला विशेष महत्व असून यंदा मुक्ताईंच्या पादुका पालखी सोहळ्याचे ३१५ वे वर्षे आहे. आज मोठया भक्तिमय वातावरणात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मातेच्या समाधिस्थळापासून पंढरपूरच्या दिशेने पालखी निघाली. २७ दिवसांचा पायी प्रवास करून हा सोहळा १४ जुलैला पंढरपुरात दाखल होणार आहे.
या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून पहाटे सकाळी चार वाजता पादुका पूजन सह संस्थानतर्फे अध्यक्ष रवींद्र पाटील अभिषेक सोहळा झाला असून त्यानंतर मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. भजनी मंडळी व वारकऱ्यांचा भजन तसेच अभंग गायनाने पालखी मार्गस्थ करण्यात आली.

यावर्षी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील नाचनखेडा येथील राजेश पाटील यांच्या बैलजोडीला पालखीचा रथ ओढण्याचा मान मिळालेला आहे. तब्बल १०० पेक्षा अधिक दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील संत मुक्ताईचे दर्शन घेतले. श्री संत मुक्ताईच्या पालखीचे मंत्री महाजन आणि आ पाटील खांदेकरी झाले असून टाळ हातात घेवून भजन कीर्तनात सहभागी झाले.भजन सुरू असताना वारकऱ्यांसोबत पावली देखील खेळली.
मुक्ताईनगर येथील नवीन मंदिरात आज पालखीचा पहिला मुक्काम होईल. यानंतर उद्या अनुक्रमे मलकापूर, मोताळा, बुलढाणा, येळगाव, चिखली, भरोसा फाटा, देऊळगाव माही, देऊळगाव राजा, जालना, काजळा फाटा, अंबड, वडीगोत्री, गेवराई, पाडळशिंगी, बीड माळीवेस, बीड बालाजी मंदिर, बानगाव फाटा, पारगाव, वाकवड, भूम, जवळा, शेंद्री, माढा, आष्टीचा मुक्काम. नंतर पंढरपूर कडे रवाना होईल…
17 जुलैला आषाढी एकादशी आहे त्यामुळे आदिशक्ती मुक्ताईची पालखी देखील पंढरपूरकडे रवाना झाली असून अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या वारीला सुरुवात झालेली आहे.सरकारच्या वतीने सुरक्षित स्वच्छ आणि निर्मल वारी व्हावी यासाठी सर्व काळजी घेण्यात आलेली असून ग्रामविकास विभाग अंतर्गत 38 कोटी रुपये इतर विभागअंतर्गत जवळपास 70 कोटी रुपये या दिंडीला देण्यात आले आहेत. दिंडीत कुठलाही अपघात घडू नये यासाठी सर्व काळजी घेण्यात आली आहे मात्र पहिल्यांदाच आमच्या सरकारने वारकऱ्यांचा विमा उतरवला आहे.
लवकरच मुक्ताई तीर्थक्षेत्रेला ब दर्जा मिळालेला असून अ दर्जा कसा मिळेल यासाठी देखील प्रयत्न करणार असून मुक्ताई मातेच्या दोन्ही मंदिरांच्या अपूर्ण कामासाठी अजून निधी देण्यात येईल असे म्हणत यावर्षी चांगला पाऊस पडू दे, शेतकरी राजाला सुखी ठेव कुठेही अतिवृष्टी, दुष्काळ होता कामा नये, काही करून शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे. आदिशक्ती मुक्ताई च्या आशीर्वादाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आणि आपला भारत त्यांच्या नेतृत्वात चांगला विकसित होऊ दे असे साकडे यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आदिशक्ती मुक्ताई चरणी घातले आहे. तर विधानसभेसाठी काही मागणं मला उचित वाटत नाही नक्कीच आई मुक्ताई आम्हाला विधानसभेसाठी शक्ती देईल असे देखील मंत्री महाजन यावेळी म्हणाले.
ML/ML/SL
18 June 2024