मंत्री अब्दुल सत्तार हाजीर हो…..

 मंत्री अब्दुल सत्तार हाजीर हो…..

छ. संभाजीनगर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सिल्लोड न्यायालयात दाखल फौजदारी याचिका क्रमांक 461/2023 मध्ये दिवाणी तथा फौजदारी न्यायालय सिल्लोड यांनी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांना समन्स बजावण्याचे आदेश दिले आहेत. काल न्यायालयामार्फत हे समन्स जारी करण्यात आले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयात हजर होऊन नियमित जामीन घ्यावा लागणार आहे.

या प्रकरणातील हकीकत अशी की, सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरलाल शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ. अभिषेक हरिदास यांनी सिल्लोड न्यायालयात लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 125-अ अनुसार दिनांक 11.11.2022 रोजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात फौजदारी याचिका दाखल केली होती. याचिकेत त्यांनी आरोप केले होते की, मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड – सोयगाव विधानसभा निवडणुकीत 2014 आणि 2019 च्या निवडणूक शपथपत्रात दिशाभूल करणारी तसेच खोटी माहिती नमूद करून निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे.

त्यानुसार या न्यायालयाने सदर प्रकरणांमध्ये तब्बल तीन वेळा पोलिसांमार्फत चौकशी अहवाल मागविला होता. अहवालानुसार आरोपात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे निष्कर्ष नोंदवून सिल्लोड न्यायालयाने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात याचिका दाखल करून घेत, न्यायालयीन कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले होते.
या न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा तथा सत्र न्यायालय, छत्रपती संभाजी नगर येथे आव्हान दिले होते. जिल्हा न्यायालयाने वादी तसेच प्रतिवादी यांचे दोघांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांचे अपील फेटाळून लावले होते.

त्यामुळे याचिकाकर्त्यांनी सिल्लोड न्यायालयात अर्ज देऊन मंत्री अब्दुल सत्तार यांना समन्स बजावण्याची विनंती केली. त्यानुसार मंत्री अब्दुल सत्तार यांना काल संध्याकाळी न्यायालयामार्फत समन्स जारी करण्यात आले आहेत. सदर फौजदारी प्रकरणामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांची आमदारकी सध्या धोक्यात असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार लटकलेली आहे. याचिकाकर्त्यांनी भारतीय न्यायव्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून, लवकरच त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ML/ML/PGB
24 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *