बेस्ट मुख्यालयावर आपचा धडक मोर्चा
मुंबई दि.28( एम एमसी न्यूज नेटवर्क): मागील कित्येक वर्षांपासून जे वीज ग्राहक प्रामाणिकपणे वीज बिल भरणा करत आहेत अशा 11 लाख ग्राहकांना दोन महिन्याच्या मासिक बिलाची अतिरिक्त अनामत रक्कम भरण्यासाठी बेस्ट प्रशासनाच्या विद्युत विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. हा सर्वसामान्य प्रामाणिक वीज ग्राहकांवर अन्याय आहे. या घटनेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी तर्फे आज मुंबईच्या कुलाबा येथील बेस्ट भावनावर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात हजारोंच्या संख्येने आपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आधीपासूनच विजेचे दर वाढलेले आहेत. त्यातच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू देखील महाग झाल्या आहेत, असे असताना सुद्धा वीज ग्राहकांकडून अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेची मागणी करणे म्हणजे वीज ग्राहकांची अक्षरशः लूट आहे. यासाठी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने बेस्ट प्रशासनाचा जाहीर निषेध करतो.
बेस्ट विभाग हा मुंबई महागरपालिकेच्या अखत्यारीत येतो आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आता कुणाचीही सत्ता नाही. सरकारकडून फक्त एक प्रशासक नेमण्यात आलेला आहे. बाकी मुंबई महानगरपालिकेची सूत्रे शिंदे – फडणवीस सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. शिंदे – फडणवीस सरकार राज्यातील महानगरपालिका निवडणुका अजून घेतलेल्या नाहीत.
अतिरिक्त सुरक्षा अनामत रकमेच्या नावाखाली वीज ग्राहकांना लुबाडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपसाठी निवडणूक निधी जमा करत आहेत का? असा आरोप आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन बोलत होत्या. मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज कंपन्यांकडून सर्वसामान्य जनतेची लूट सुरु आहे. काही दिवसांपूर्वी बेस्टच्या विद्युत विभागाकडून बेस्टच्या वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा अनामत शुल्क भरण्याचे पत्र आले होते.
एकीकडे विजेचे दर वाढत असताना दुसरीकडे अतिरिक्त अनामत रक्कम भरण्यास सांगून जनतेस लुबाडू पाहणाऱ्या मनमानी बेस्ट प्रशासनाच्या विरोधात हा मोर्चा असल्याचे आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या.
SW/KA/SL
28 Dec. 2022