केजरीवालांच्या अटकेच्या निषाधार्थ ३१ मार्चला दिल्लीत महारॅली

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मद्य घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने 28 मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.या अटकेच्या निषेधार्थ इंडिया अलायन्सने दिल्लीत महारॅली काढण्याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर ३१ मार्च रोजी ही रॅली काढण्यात येणार आहे.हा केवळ अरविंद केजरीवाल यांचाच प्रश्न नाही. पण पंतप्रधानांनी ज्याप्रकारे देशांतर्गत हुकूमशाही पद्धत चालवली आहे. देशातील लोकशाहीची हत्या करत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे, संविधानाला मानणाऱ्या लोकांच्या मनात आक्रोश निर्माण झाला झाल्याचं मत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत मांडलं.
देशात पंतप्रधांनी सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्ष फोडले. खोटे खटले करून आणि अटक करून संपूर्ण विरोधी पक्षाला एक एक करून संपवण्याचं कारस्थान सुरू आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक “पश्चिम बंगालपासून बिहारपर्यंत इंडिया आघाडीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्यात आला. याविरोधात दिल्ली आणि देशात निदर्शने सुरू आहेत. येत्या काही दिवसांतही निदर्शने सुरूच राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा कारभार कसा चालणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र अरविंद केजरीवाल यांनी तुरूंगातून सरकार चालवणार असल्याचे स्पष्ट केले असून आज त्यांनी कोठडीतून पहिला आदेशही जारी केला आहे.कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडी कोठडीतून पहिला आदेश जारी केला आहे. दिल्ली सरकारच्या जल मंत्रालयाशी संबंधित हा पहिला आदेश अरविंद केजरीवाल यांनी जारी केला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकार हे दिल्लीमधून चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
SL/ML/SL
24 March 2024