या युरोपीय देशात कामाचे तासकमी करण्याचा प्रस्ताव
 
					
    माद्रिद, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशातील काही उद्योजक कामाचे तास जास्तीत जास्त करण्याबाबत वक्तव्य करत आहेत. तर मानवी श्रमांचे मोल माहित असणाऱ्या जगातील काही देशांत आठवड्यातील कामाचे तास कमी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. स्पॅनिश सरकार कर्मचाऱ्यांचे आठवड्यातील कामाचे तास कमी करण्याचा विचार करत आहे. काल झालेल्या स्पेनच्या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कामगार मंत्री योलांडा डियाझ यांनी कामाचे तास कमी करण्याविषयीचा प्रस्ताव सादर केला. मंत्रीमंडळाने हा प्रस्ताव स्विकारला आहे.या प्रस्तावानुसार, स्पेनमधील कामगारांच्या कामाच्या तासात कपात करण्यात येणार असून त्यांना आता ४० ऐवजी ३७.५ तास काम करायचे आहे. हा प्रस्ताव संसदेत सादर केला जाणार आहे.
प्रस्तावाबद्दल स्पेनचे कामगार मंत्री व उपपंतप्रधान डियाझ म्हणाले की, कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवून त्यांचे जीवन सुधारण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे.या प्रस्तावाला नोकऱ्या पुरवणाऱ्या कंपन्यांच्या संघटनेनांनी मात्र विरोध केला आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्याकडे पूर्ण बहुमत नसल्याने या प्रस्तावाला इतर पक्ष पाठिंबा देतील की नाही याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्पेनमध्ये कामाच्या तासांमध्ये कपात करण्याच्या विरोधात निदर्शने झाली होती.
 
                             
                                     
                                    