मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्यालय
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्य संकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात य्ईल अशी घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. काल मंत्रालयात तारपोरवाला मत्स्यालयासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी यासंदर्भातील निर्देश विभागाला दिले.A new world-class aquarium in Mumbai
हे नवीन जागतिक दर्जाचे मत्स्यालय सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करता येईल का याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचीही सूचना मंत्रीमहोदयांनी विभागाला केली आहे. हे मत्स्यालय जगातील सर्वोत्तम मत्स्यालयापैकी एक गणले जावे, याचे नियोजन करावे असेही निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
मुंबईची ओळख असलेले तारापोरावाला मत्स्यालय गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांसाठी बंद आहे. तारापोरवाला मत्स्यालय इमारत आणि आवारातील इतर दोन इमारती या धोकादायक झाल्याने त्या पाडून त्यांची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. तारापोरावाला मत्स्यालयाची इमारत जवळपास 75 वर्षे जुनी आहे. तर बाजूची असलेली इमारतही 50 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. मत्स्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का पोहोचला असून त्या धोकादायक असल्याचे सा.बां. विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या इमारती लवकरात लवकर निर्लेखित करण्याचे निर्देशही मंत्रीमहोदयांनी दिले आहेत.
सध्या तारापोरावाला मत्स्यालयात 16 सागरी पाण्याच्या टाक्यांमध्ये 31 प्रकारचे मासे आहेत. तर गोडया पाण्यातील आणि 32 ट्रॉपीकल टाक्यांमध्ये 54 प्रकारचे मासे आहेत.
तारापोरावाला मत्स्यालयाबाबतच्या या आढावा बैठकीस मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव पराग जैन नानोटिया, मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, सहआयुक्त युवराज चौगले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
ML/KA/PGB
23 Nov .2022