‘परंपरा’ मधून अनुभवला व्हायोलिनचा सुरेल अविष्कार
पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): व्हायोलीन मधून निघणारे मधूर स्वर…जोडीला तबल्याची समर्पक साथ अशा सूरमयी वातावरणात व्हायोलिनच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तीन पिढ्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या प्रख्यात व्हायोलिनवादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर या ख्यातनाम कलाकारांनी आपल्या सुरेख सादरीकरणाने पुणेकरांची मने जिंकली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या सहाव्या दिवशी व्हायोलिनवादक डॉ. संगीता शंकर, नंदिनी शंकर आणि रागिणी शंकर यांनी ‘परंपरा’ हा कार्यक्रम सादर केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राग श्यामकल्याणमध्ये विलंबित एकतालात बंदिश सादर केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी झालेल्या सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली. त्यानंतर मध्यलय तीनताल त्यांनी सादर केला. मध्यलय दृत एकताल, आडा चारताल सादर करताना व्हायोलीनचे निघणारे सूर त्यांच्या ३ पिढ्यांच्या अद्भुत वादन परंपरेची साक्ष देत होते. कार्यक्रमाच्या समारोपाला बनारसची एक वेगळी रचना ‘होरी’ सादर करीत ‘सुखकर्ता दुखहर्ता’ आरती देखील व्हायोलिन वर सादर केली.
संगीत महोत्सव ३० मार्च पर्यंत होणार असून यावर्षी पुण्यासह देशभरातील दिग्गज कलाकारांचे सादरीकरण हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ७ ते १० यावेळेत हे दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
ML/KA/PGB
28 Mar. 2023