BKC मध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडत आहे. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. या धामधुमीत मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. काल रात्री वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या एका कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली असून येथून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. येथे ५, १०, २०, १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या.
मुंबई पोलिसांना बीकेसी येथे एक बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथक तयार करून शनिवारी रात्री येथे धाड टाकण्यात आली. या याठिकाणी बनावट नोटा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांना दिसले. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी नौशाद शाह, अली सय्यद या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. पोलिस सध्या आरोपींची चौकशी करत आहेत. या नोटा कुणाला वितरित करण्यात आल्या याचा शोध पोलिस घेत आहेत.
मुंबई पोलिसांनी कारवाई करत काही दिवसांपूर्वी दादर आणि सायन भांडुप येथून साडेतीन कोटींची रोकड एका गाडीतून जप्त केली होती. दरम्यान, ही रोडक एका एटीएम व्हॅनची असल्याचे समोर आले आहे. मात्र, यानंतर ही गाडी सोडून देण्यात आली होती. तर सायन येथे एका कारमधून १ कोटी ८७ लाख ८० हजार रुपये जप्त करण्यात आले होते. याची माहिती आयकर खात्याला देण्यात आली होती. दादर येथे देखील कारवाई करून मोठी रक्कम जप्त करण्यात आली होती.
SL/ML/SL
5 May 2024