प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीवर मुंबईत गुन्हा दाखल

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीच्या विरोधात महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली हिच्याबद्दल खोटी पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. अंजलीने यूपीएससी परीक्षेला न बसताच उत्तीर्ण झाल्याची माहिती ध्रुव राठीच्या एक्स अकाऊंटवरून देण्यात आली होती. पोलिसांनी भारत न्याय संहिता कायद्याखाली अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. जाणुनबुजून एखाद्याची बदनामी करत सामाजिक शांततेला धक्का पोहोचवण्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार आगळीक करणारे विधान केल्याबद्दलही गुन्हा दाखल झाला आहे.
ध्रुव राठी हा युट्यूबवर चांगलाच प्रसिद्ध आहे. राजकीय, विश्लेषणात्मक व्हिडीओ ध्रुवकडून तयार केले जातात. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात काही व्हिडीओ टाकले होते. त्या व्हिडीओंना प्रसिद्धी मिळाली होती. भाजपा समर्थकांकडून ध्रुव राठीला अनेकदा लक्ष्य करण्यात येत असते. ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी टाकलेली पोस्ट ही थेट ध्रुव राठीच्या वैयक्तिक अकाऊंटवरून गेलेली नाही. ध्रुव राठी पॅरोडी या नावाने असलेल्या अकाऊंटवरून सदर पोस्ट करण्यात आली होती.
एक्सवरील ध्रुव राठीच्या पॅरोडी अकाऊंटवर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते, “भारत हा एकमेव असा देश आहे, जिथे तुम्ही यूपीएससी सारख्या परीक्षेला न बसताही उत्तीर्ण होऊ शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी असणे आवश्यक आहे. ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हीने यूपीएससी परीक्षा न देताच त्यात यश मिळविले. अंजली बिर्ला ही व्यवसायाने मॉडेल आहे. मोदी सरकारने शिक्षणाच्या क्षेत्राची थट्टा उडवली आहे.”
अंजली बिर्लाने (२३) पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या तीनही परीक्षेत यश मिळविले. २०१९ साली झालेल्या मुख्य परीक्षेच्या निकालानंतर अंजली बिर्लाचे नाव मेरीट यादीत झळकले होते. अंजलीचा चुलत भाऊ नमन महेश्वरीने तक्रार दाखल केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याचे सांगितले जात आहे.
SL/ML/SL
13 July 2024