महात्मा जोतिबा फुले: सामाजिक क्रांतिकारक आणि वास्तववादी समतेचे अग्रदूत

मुंबई, दि. 11 (राधिका अघोर) :महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती. महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा असेल, तर त्याची व्याप्ती, आवाका एवढा मोठा आहे, की थोडक्या शब्दांत तो मांडता येणारच नाही. त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करण्याऐवजी, त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि त्यामागच्या विचारांचा, जे आज अधिकच प्रासंगिक आहेत, त्यांचा परिचय करून घेऊया. महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ आणि वयाच्या ६३ व्या वर्षी २८ नोव्हेंबर १८९० साली त्यांचा मृत्यू झाला. हा कालखंड मुद्दाम अशासाठी नमूद केला, की त्या काळच्या समाजिक परिस्थितीची आपल्याला कल्पना यावी. आपण एकोणविसाव्या शतकाबद्दल, ब्रिटिश राजवटीतील परतंत्र भारताच्या काळाबद्दल बोलतो आहोत.
ह्या संपूर्ण काळात भारत एका तमोयुगातून जात होता. अनेक अनिष्ट प्रथा, परंपरा, जातिभेद, स्त्री-पुरुष भेद, रूढी, अंधश्रद्धा अशा सगळ्याची घनदाट काजळी भारताच्या एकेकाळाच्या ज्ञानाज्योतीवर चढली होती. अशा काळात, अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोतिराव फुले यांनी आपली उपजत बुद्धिमत्ता आणि शिक्षण ह्या जोरावर, त्यांचे जे विचार समर्थपणे मांडले, ते त्या काळाच्या तर कितीतरी पुढचे होतेच, खरं तर ते कालातीत होते. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्वतः मुलींसाठी शाळा काढली, आणि त्या शाळेत, शिक्षिका म्हणून आपली पत्नी सावित्रीची नेममूक केली.
अस्पृश्यांसाठीही त्यांनी शाळा काढली. शिक्षणातून समानता येईल, यावर त्यांचा दृढविश्वास होता, म्हणूनच ही संधी प्रत्येकाला मिळावी, यासाठी ते आग्रही होते. जोतिबा फुले यांचा ज्यावेळी आपण विचार करतो, तेव्हा, त्यांना वेगळं, एकटं बघूच शकत नाही, त्यांच्यासोबत सावित्रीबाई आल्याच ! सावित्रीबाईंनी त्यांना खंबीरपणे साथ दिली, हे तर महत्वाचे आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, त्या दोघांमधलं नातं. ते संपूर्ण समानतेचं नातं होतं. महात्मा फुले केवळ स्त्री पुरुष समानतेचा विचार करून थांबले नाहीत, त्यांनी तो विचार आयुष्यभर आचरणात आणला. लहानग्या वयात, त्यांनी सावित्रीला शिक्षण दिलं, ते देतांनाच केवळ पुस्तकी शिक्षण नाही, तर आयुष्याचं शिक्षण, जगण्याचं प्रयोजन आणि सामाजिक जाणिवा जागृत होतील, असं त्यांनी तिला घडवलं आणि सावित्रीसोबत ते ही घडत गेले.
ते एकमेकमांचे सोबती होते, मित्र-सहचर होते. हा विचार त्या काळाच्या कितीतरी पुढे होता. म्हणूनच, सावित्रीबाई इतके कष्ट, अपमान, अवहेलना सोसूनही आपल्या कार्याशी एकनिष्ठ राहिल्या, त्यांना भीती वाटली नाही, त्यांचा संयम ढळला नाही. अगदी जोतिरावांचे निधन झाल्यावरही सावित्रीबाईंनी आपला समाजसेवेचा वसा कायम ठेवला, इतके ते एकरूप होऊन गेले होते. पतिपत्नी मधील, असे मित्रत्वाचे नाते, त्या काळात फारच दुर्मिळ होते. त्या दोघांची परिपक्वता आणि एकच ध्येय याची प्रेरणा ह्या नात्यामागे असेल.
एकूणच, संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत. कौटुंबिक जीवनाची आणि समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. ‘कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी आणि भिक्षुक होतात आणि प्रपंच खरा नाही, व्यर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो’, असे त्यांचे स्पष्ट मत होते. हा विचारच मूळात क्रांतिकारक होता, जो आजही अनेकांच्या पचनी पडायला वेळ लागतो.
धर्माबद्दलही त्यांची आधुनिक मतं होती. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे ते रोखठोकपणे सांगत. मात्र, विश्वनिर्मिती करणारी कोणतीतरी शक्ती आहे, अशी त्यांची विचारसरणी होती. धर्म, जाती आधारावर भेद भाव, उच्चनीचता निर्माण न करता, सर्वांनी एकत्र राहावं असा विचार आणि कृती याबद्दल ते आग्रही होते.
त्यांच्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतिराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते.
महात्मा फुले यांनीसर्वसामान्य मानवाला, सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते , जोतीरावांचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता.
त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात काय आमूलाग्र बदल घडवून आणायला हवा यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत, याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले. केवळ लेखन करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी या सगळ्या समाजसुधारणेसाठी, सत्यशोधक समाज ही सामाजिक चळवळ सुरू केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ही चळवळही त्या दोघांनी मिळून चालवली.
आज ह्या दांपत्याला भारतरत्न दिलं जावं, अशी शिफारस महाराष्ट्र सरकारनं केली आहे. म्हणजे देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराचा विचार करतांनाही त्यांच्याकडे एकत्रितपणेच बघितले जाते. ही त्यांच्या एकरूपतेचीच ओळख आहे. शिवशक्तिचे हे आधुनिक रूप असलेले महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई म्हणजे देशातले समाज सुधारक दाम्पत्य नाही, तर सामाजिक क्रांतिकारक म्हणता येतील.
महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !
ML/ML/PGB 11 April 2025